येडेश्वरी कारखाना परिसरात अजित दादांचे भव्य स्मारक उभारणार :खा.बजरंग सोनवणे यांची घोषणा.
जिल्ह्याची सिस्टीम बदलण्यासाठी दादाच पालकमंत्री हवे होते.
रोखठोक न्यूज वार्ताहर
केज: येडेश्वरी साखर कारखाना परिसरात दिवंगत लोकनेते अजित पवार यांचे भव्य व दिव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली. येडेश्वरी साखर कारखाना येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर चौरे, अमर देशमूख यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना खा.बजरंग सोनवणे म्हणाले, अजित दादा हे माझे राजकीय वडील होते. १९९२ पासून त्यांच्याशी माझा संबंध आला आणि १९९९ पासून माझी राजकीय घडण सुरू झाली. माझ्या संपूर्ण राजकीय प्रवासात दादांचे मोलाचे योगदान असून, त्यांच्या जाण्याने राजकीय छत्र हरपले आहे. देशासह महाराष्ट्राची मोठी हानी त्यांच्या जाण्याने झाली असून, त्यांची पोकळी कधीही भरून निघू शकणार नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. येडेश्वरी साखर कारखाना उभारण्यात अजित पवार यांचा मोठा वाटा असल्याचे नमूद करत, त्यांच्या स्मरणार्थ कारखान्याच्या प्रांगणात स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सोनवणे यांनी सांगितले. या स्मारकासाठी २१ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून, आपण स्वत: त्या समितीचे सदस्य असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या कारखान्यात सध्या सुमारे १८०० कर्मचारी, जवळपास ७ हजार कामगार कार्यरत असून, त्यांच्या सहभागातून हे स्मारक उभारण्यात येणार आहे. पुढील एक वर्षाच्या आत स्मारक पूर्ण करून प्रथम पुण्यतिथीच्या कालावधीत लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.अजित पवार यांनी बीड जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेतला होता. मात्र दादा आपल्यातून गेल्याने जिल्हा पुन्हा एकदा पोरका झाला असून, हे बीडचे दुर्दैव आहे. त्यांचे सामाजिक कार्य अतिशय व्यापक होते, असेही सोनवणे यांनी नमूद केले.
––विलीनीकरणावर योग्यवेळी बोलू
दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर बोलताना, सध्या यावर बोलणे योग्य नसल्याचे सांगत, योग्य वेळ आल्यावर आपली भूमिका स्पष्ट करू, असे त्यांनी सूचक विधान केले. दादांच्या निधनाचे दु:ख मनातून असल्याने दहा दिवसांचा दुखवटा पाळला असून, याच कारणामुळे अर्थसंकल्पावरही भाष्य केले नसल्याचे त्यांनी सांगितले.
—हायस्पीड रेल्वेसाठी प्रयत्नशील
रेल्वे विकासाबाबत बोलताना, बीड जिल्ह्यात रेल्वेचे जाळे वाढवून परळीपर्यंत हायस्पीड रेल्वे आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. हे अजित पवार यांचेही स्वप्न होते; ते असते तर हे काम अधिक लवकर झाले असते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
—विमान अपघाताची चौकशी व्हावी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त करत, या घटनेची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे खा.सोनवणे यांनी सांगितले. विमानतळापासून ते अपघातस्थळापर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज जनतेसमोर यावे, तसेच या प्रकरणाची रॉ मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
–सिस्टीम बदलण्यासाठी दादा आवश्यक होते
जरांगे पाटील यांना धमकी देणाऱ्या कॉल रेकॉर्डिंग प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, हे नीच प्रवृत्तीचे कृत्य असून पाटील हे समाजाच्या हितासाठी काम करणारे पूजनीय व्यक्तिमत्त्व असल्याचे सोनवणे यांनी स्पष्ट केले.बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्याची सिस्टीम बदलण्यासाठी अजित पवार यांना किमान आणखी दोन वर्षे पालकमंत्री म्हणून राहणे आवश्यक होत\आजही गुंडगिरी पूर्णपणे कमी झालेली नाही; एखाद-दुसरा अधिकारी बदलून जिल्हा सुधारत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

