जेष्ठ पत्रकार धनंजय कुलकर्णी यांचे घरकुल हडपले?
निधी गायब… आणि उलट घर बांधा म्हणून केज नगरपंचायतीची नोटीस! केजमध्ये संताप
केज नगरपंचायत चा अजब गजब कारभार.
रोखठोक न्यूज वार्ताहर
केज नगरपंचायतीच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पंतप्रधान आवास योजनेतील कथित गैरव्यवहार आता अधिकच धक्कादायक वळणावर पोहोचला आहे. जेष्ठ पत्रकार धनंजय भगवानराव कुलकर्णी यांच्या नावावर ३०\१\२०१९ रोजी घरकुल मंजूर झाले होते,मंजूर निधी दाखवून, निधी उचलल्याचा आरोप आधीच चर्चेत असताना, आता नगरपंचायतीने त्यांनाच घर बांधण्याची नोटीस बजावल्याने संतापाची लाट उसळली आहे.
मंजुरी कागदावर… लाभ मात्र शून्य
माहितीनुसार, सन २०१८–२०१९ मध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून ३०\१\२०१९धनंजय कुलकर्णी यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात घरकुलासाठी कोणताही हप्ता मिळाला नाही, तसेच बांधकामही झाले नाही, असा आरोप आहे.
दरम्यान, २०२१–२०२२ दरम्यान कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण दाखवत निधी उचलण्यात आला आहे यात तत्कालीन अधिकारी व काही स्थानिक घटकांच्या संगनमताची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कहर म्हणजे — निधी नाही, तरी ‘घर बांधा’ नोटीस!
समोर आलेल्या अधिकृत नोटीसनुसार, नगरपंचायतीने कुलकर्णी यांना घरकुलाचे बांधकाम सुरू न केल्याबद्दल कारणे विचारत ७ दिवसांत काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र, घरकुलाचा एकही हप्ता न देता लाभार्थ्यालाच नोटीस पाठवणे, हा प्रकार नागरिकांच्या मते प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा कळस मानला जात आहे.
“निधीच मिळाला नाही, तर घर बांधायचे कसे?” असा सरळ सवाल आता उपस्थित होत आहे.
‘मोडस ऑपरेंडी’ उघडकीस?
या प्रकरणामुळे नगरपंचायतीत लाभार्थ्यांच्या नावावर कागदोपत्री कामे पूर्ण दाखवून निधी काढण्याचे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय अधिक बळावला आहे. प्रत्यक्ष लाभार्थी अंधारात ठेवून शासनाच्या निधीवर डल्ला मारल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
पत्रकार संघटना आक्रमक
या प्रकारानंतर पत्रकार संघटना आणि नागरिकांनी तीव्र भूमिका घेतली आहे.
“पत्रकाराच्या नावावरच असा प्रकार होत असेल, तर सामान्य नागरिकांचे काय?” असा सवाल उपस्थित करत सखोल चौकशी व दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाची अग्निपरीक्षा
आता या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करणार की प्रकरण दडपले जाणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. आरोप सिद्ध झाल्यास नगरपंचायतीतील अनेक मोठी नावे अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

