• Wed. Jun 3rd, 2026

वृक्षलागवडीच्या नावाखाली केज नगरपंचायतीची उधळपट्टी? ६ हजार झाडांचा दावा, प्रत्यक्षात केवळ २–३% झाडे जिवंत एका झाडाची किंमत ४०, प्रती खड्डा १०० — लाखो रुपयांचा खर्च; मात्र झाडे कुठे गेली? चौकशीची मागणी

Bybaba maske

Mar 6, 2026

वृक्षलागवडीच्या नावाखाली केज नगरपंचायतीची उधळपट्टी?

६ हजार झाडांचा दावा, प्रत्यक्षात केवळ २ ते ३ टक्केच झाडे जिवंत

एका झाडाची किंमत ४०, प्रती खड्डा १०० — लाखो रुपयांचा खर्च; मात्र झाडे कुठे गेली? चौकशीची मागणी

रोखठोक न्यूज वार्ताहर

‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ अभियानांतर्गत बीड जिल्ह्यात मा. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते ७ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्यात तब्बल ३० लाख झाडे लावल्याचा दावा करण्यात आला होता. त्याच अनुषंगाने केज नगरपंचायतीच्या वतीने सुमारे ६ हजार झाडे लावल्याचा विक्रम केल्याचे सांगण्यात आले.

या वृक्षलागवडीसाठी शासकीय मोकळी जागा, विविध शासकीय कार्यालयांच्या परिसरात, जिल्हा परिषद शाळांच्या आवारात तसेच काही खासगी जागांचीही निवड करण्यात आली होती. मात्र या मोहिमेवर खर्च झालेल्या पैशांच्या तुलनेत प्रत्यक्षात झाडे जिवंत राहिल्याचे प्रमाण अत्यंत नगण्य असल्याचे समोर येत आहे.

माहितीनुसार प्रत्येक झाडासाठी सुमारे ४० तर प्रत्येक खड्ड्यासाठी १०० इतका खर्च करण्यात आला. म्हणजेच हजारो झाडांच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता लावलेल्या झाडांपैकी केवळ २ ते ३ टक्के झाडेच सध्या जिवंत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी पाहणी केली असता झाडे तर दूरच, पण त्या ठिकाणी खड्डेही दिसत नाहीत. काही ठिकाणी केवळ वाळलेल्या काड्या आणि रिकामे खड्डे दिसून येत असून हे चित्र नगरपंचायतीच्या नियोजनशून्य कारभाराची साक्ष देत आहे.

नगरपंचायतीने ६ हजार झाडे लावल्याचा दावा केला असला, तरी त्यापैकी नेमकी किती झाडे जिवंत आहेत याची अचूक माहितीही प्रशासनाकडे नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही संपूर्ण मोहीम केवळ कागदोपत्री आकडेवारीपुरतीच मर्यादित राहिली का? असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर वृक्षलागवड मोहिमेत झालेल्या खर्चाची आणि प्रत्यक्ष लागवडीची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!