• Wed. Jun 3rd, 2026

“आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय” — एका गटविकास अधिकाऱ्यांच्या काळातील घोटाळ्यावर दुसऱ्याची केवळ चौकशी समिती. नांदूरघाट घरकुल घोटाळा उघड! परप्रांतीयांच्या बोगस खात्यावर पैसे, पंचायत समितीची चौकशी मात्र गायब

Bybaba maske

Mar 7, 2026

“आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय” — एका गटविकास अधिकाऱ्यांच्या काळातील घोटाळ्यावर दुसऱ्याची केवळ चौकशी समिती.

नांदूरघाट घरकुल घोटाळा उघड! परप्रांतीयांच्या बोगस खात्यावर पैसे, पंचायत समितीची चौकशी मात्र गायब

रोखठोक न्यूज वार्ताहर | केज

केज तालुक्यातील नांदूरघाट येथे २०२३–२४,२०२४-२५ मध्ये मंजूर झालेल्या घरकुल योजनेंतर्गत मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीतच या प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून बिहार आणि उत्तर प्रदेश येथील परप्रांतीयांच्या नावावर बोगस बँक खाती उघडून घरकुल योजनेची रक्कम उचलल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत मासिक बैठकीदरम्यान एका महिला सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित करत नांदूरघाटमधील घरकुल घोटाळ्यात परप्रांतीयांनी लाभ घेतल्याची माहिती दिली. इतकेच नव्हे तर त्या परप्रांतीयांची नावेही बैठकीत उघड करण्यात आली. यावर ग्रामसेवक भगवान सिरसाट यांनी हा घोटाळा ग्रामपंचायत स्तरावरून नसून पंचायत समिती स्तरावरून झाल्याचे सांगत “सोमवारपर्यंत चौकशी करून माहिती देतो,” असे आश्वासन दिले होते.

मात्र शनिवार उजाडला तरी ग्रामसेवकांकडून कोणतीही चौकशीची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

दरम्यान, केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांनी वर्तमानपत्रात आलेल्या बातमीच्या अनुशंगाने चौकशी समिती नेमल्याचे सांगितले आहे. मात्र ही चौकशी नेमकी किती दिवस चालणार, कोणापर्यंत पोहोचणार आणि अहवाल कधी देणार याबाबत कोणतीही स्पष्टता दिलेली नाही.

एका बाजूला घरकुल योजनेच्या लाभासाठी परप्रांतीयांची बोगस खाती तयार होतात, त्यावर पैसे काढले जातात आणि दुसऱ्या बाजूला प्रशासन केवळ चौकशी समित्या नेमण्यात व्यस्त आहे. त्यामुळे “एका गटविकास अधिकाऱ्यांच्या काळात घोटाळा आणि दुसऱ्यांच्या काळात चौकशीचा फास” अशी स्थिती निर्माण झाली आहे.

आजच्या डिजिटल युगात संगणकाच्या एका क्लिकवर लाभार्थी, बँक खाते आणि व्यवहारांची माहिती मिळू शकते. तरीही चौकशी लांबणीवर टाकली जात असल्याने या प्रकरणात कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नांदूरघाटसारख्या साध्या गावात जर परप्रांतीयांनी बोगस खाती उघडून घरकुल योजनेची रक्कम उचलली असेल, तर हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे. यामागे नेमके कोणते संगणक चालक, अधिकारी किंवा दलाल कार्यरत आहेत याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

सध्या मात्र परिस्थिती अशी आहे की — “आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय”, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!