“जिल्हा परिषद शाळेची जागा कुठेही जाणार नाही, हा माझा शब्द” — आमदार नमिताताई अक्षय मुंदडा
केजमधील माजी विद्यार्थ्यांकडून आमदारांचा सत्कार; शाळा वाचवण्यासाठी दिलेल्या लढ्याला सलाम
रोखठोक न्यूज वार्ताहर | केज
केज शहरातील सर्वात जुनी आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या जागेबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर “ही जागा कुठेही जाणार नाही, हा माझा शब्द,” असा ठाम विश्वास व्यक्त करणाऱ्या आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांचा आज माजी विद्यार्थ्यांकडून सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला.
केज शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळे काही काळापासून बंद पडली होती. त्यामुळे या मोक्याच्या जागेवर नगरपंचायतीने हक्क सांगत ठराव घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ही शाळा वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत “शाळा बचाव” मोहीम सुरू केली.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत शिकलेल्या जवळपास ६०० माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत जनजागृतीपर रॅली काढली होती. तसेच शाळेच्या पुनरुज्जीवनासाठी अनेकांनी स्वखर्चाने देणग्याही दिल्या. शाळा पुन्हा सुरू व्हावी आणि शिक्षणासाठीच ही जागा राखून ठेवावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली होती.
दरम्यान, नगरपंचायतीकडून ही जागा ताब्यात घेण्याचा ठराव झाल्यानंतर आमदार नमिताताई मुंदडा यांनी हा मुद्दा महाराष्ट्र राज्य विधिमंडळात उपस्थित केला. जिल्हा परिषद शाळेची जागा ही शिक्षण विभागाकडेच राहिली पाहिजे आणि त्या ठिकाणी शिक्षणाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठाम भूमिका त्यांनी सभागृहात मांडली.
याच भूमिकेचे कौतुक करत आज केज शहरातील सर्व माजी विद्यार्थ्यांनी आमदार नमिताताई अक्षय मुंदडा तसेच अंबानगरीचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या वेळी उपस्थित नागरिकांनी शाळेची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि पुन्हा विद्यार्थ्यांच्या हास्याने हे शाळेचे प्रांगण गजबजून जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
