• Sun. Apr 19th, 2026

केज घरकुल घोटाळा : चौकशीचा वेग मंदावला, ३७४ कुटुंबांच्या स्वप्नांवर विरजण? जनविकास,काँग्रेस सत्ताधारी ‘गांधीजींची तीन माकडं’? दिसतंय-ऐकू येतंय, पण बोलत नाहीत! विधिमंडळान चौकशीचे आठ दिवसांतील पाच दिवस गेले.

Bybaba maske

Mar 10, 2026

केज घरकुल घोटाळा : चौकशीचा वेग मंदावला, ३७४ कुटुंबांच्या स्वप्नांवर विरजण?

जनविकास,काँग्रेस सत्ताधारी ‘गांधीजींची तीन माकडं’? दिसतंय-ऐकू येतंय, पण बोलत नाहीत!

विधिमंडळान चौकशीचे आठ दिवसांतील पाच दिवस गेले.

रोखठोक न्यूज वार्ताहर

केज नगरपंचायतीतील ३ कोटी ६२ लाख रुपयांच्या घरकुल घोटाळ्याचे वादळ अचानक शांत झाल्याचे चित्र दिसत आहे. गरीब कुटुंबांच्या डोक्यावर छत यावे या उद्देशाने असलेल्या योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप असताना चौकशी अधिकारी केवळ नोटिसा देऊन गप्प बसल्याची चर्चा सुरू आहे.

या प्रकरणात तब्बल ३७४ कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्राच्या सर्वोच्च व्यासपीठावर म्हणजेच विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर प्रशासनाला आठ दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्या मुदतीतील पाच दिवस उलटून गेले असून उरलेले काहीच दिवस बाकी असताना चौकशीची ठोस हालचाल दिसत नाही, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत.

या संपूर्ण प्रकरणात माजी लेखापालावर संशयाची सुई फिरत असल्याची चर्चा आहे. मग त्याची सखोल चौकशी झाली का? त्याची जबाबदारी निश्चित झाली का? की काही “बडेमासे” वाचवण्यासाठीच चौकशीचा वेग मंदावला आहे? असे अनेक सवाल जनतेतून उपस्थित होत आहेत.

गरीबांच्या कैवाराचे राजकारण करणारे सत्ताधारी आज मात्र मुंडकं पाण्यात घालून बसल्याचे चित्र असल्याची टीका होत आहे. सत्ताधारी जनविकास आणि काँग्रेस नेत्यांना घोटाळा नेमका कोणी केला याची माहिती असूनही ते गांधीजींची तीन माकडं बनल्यासारखे वागत आहेत—दिसतंय, ऐकू येतंय, पण बोलायला कोणी तयार नाही.

दरम्यान, आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांनी हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित केल्यानेच हा घोटाळा उघडकीस आला, अन्यथा सगळे मिळून हा विषय कायमचा दाबून टाकला असता, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

परंतु सर्वात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे –

ज्यांच्या डोईवर छत येईल या आशेने वाट पाहणाऱ्या त्या ३७४ कुटुंबांचे काय?

त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या घरकुलाच्या स्वप्नांची जबाबदारी अखेर कोण घेणार?

रोखठोक न्यूजचा सवाल स्पष्ट आहे – चौकशी होणार की घोटाळा गिळून टाकला जाणार?

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!