सुस्थितीत असलेला फुले-आंबेडकर नगर येथील रमाई बौद्ध विहार पाडण्याचा घाट; २०१९ च्या २४.९५ लाखांच्या निधीचा हिशोब कुठे?
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजनेतील निधीचे काम न करता नव्या निधीतून पुन्हा बांधकाम; नागरिकांत संताप
नगरपंचायतीकडे कागदपत्रांची मागणी; स्ट्रक्चरल ऑडिट, वर्क ऑर्डर, बिल व मोजमाप पुस्तिकेच्या प्रती देण्याची मागणी – निर्णय स्थगित ठेवण्याची मागणी
रोखठोक न्यूज वार्ताहर | केज
केज नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ७ मधील फुले-आंबेडकर नगर येथील रमाई बौद्ध विहार (समाज मंदिर) सुस्थितीत असतानाही ते पाडून पुन्हा बांधण्याचा घाट घातल्याचा आरोप समोर आला असून या प्रकरणी नगरपंचायत प्रशासनाकडे कागदपत्रांची मागणी करत हरकत नोंदविण्यात आली आहे.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुदेश (दादा) मन्नमथ सिरसट यांनी नगरपंचायत केज येथे निवेदन देऊन माहिती व संबंधित कागदपत्रांच्या प्रती मागितल्या आहेत. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सदर समाज मंदिर इमारत सन २००७ ते २०१३ या कालावधीत बांधण्यात आली असून ती सध्या मजबूत व वापरण्यायोग्य स्थितीत आहे. त्यामुळे इमारत पाडण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, नगरपंचायतीने तांत्रिक सल्लागार अभियंत्यांच्या Structural Audit Report च्या आधारे इमारत पाडण्याचा विषय ठेवला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र नागरिकांनी याबाबत खालील कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती मागितल्या आहेत त्यात १}समाज मंदिर इमारत पाडण्याबाबतचा जनरल बॉडी मिटिंग व स्टँडिंग कमिटीचा ठराव २}संबंधित अभियंत्यांचा Structural Audit Report
दि. ०५ ऑगस्ट २०१९ रोजी दिलेल्या प्रशासकीय मान्यतेची प्रत
३}संबंधित कामाची वर्क ऑर्डर (Work Order)
४}काम पूर्ण झाल्याचा Completion Certificate
५}संबंधित देयके अदा केलेल्या बिलांच्या प्रती व मोजमाप पुस्तिकेतील (Measurement Book) नोंदी
यासोबतच निवेदनात गंभीर प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजना अंतर्गत सन २०१९ मध्ये या कामासाठी २४ लाख ९५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र त्या निधीत नेमके कोणते काम झाले, निधीचा खर्च कसा झाला याची माहिती अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. आता त्याच कामासाठी पुन्हा नवीन निधी आणून नवीन बौद्ध विहार उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, सुस्थितीत असलेली इमारत पाडल्यास शासनाचा अनावश्यक आर्थिक खर्च होईल. त्याऐवजी सदर इमारत कायम ठेवून उर्वरित मोकळ्या जागेत नवीन बांधकाम करून त्यावर दुसरा मजला उभारून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका (Study Center) सुरू केल्यास परिसरातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होऊ शकतो.
तसेच, जर कोणत्याही कारणास्तव इमारत पाडण्यात आली व त्यातून काही नुकसान झाले, तर त्याची जबाबदारी नगरपंचायत केजचे नगराध्यक्ष, संबंधित बांधकाम सभापती, नगरसेवक व प्रशासन यांच्यावर राहील, अशी नोंदही निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान, मागितलेली कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करून देत समाज मंदिर पाडण्याचा निर्णय पुनर्विचार करून स्थगित ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे केज शहरात चर्चा रंगली असून आता नगरपंचायत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
