अॅड. इस्माईल गवळींना मारहाण, उलट त्यांच्यावरच ३५३ चा गुन्हा; अंबाजोगाईत कायद्याची नवी व्याख्या?
सुरक्षा रक्षकांची दादागिरी की प्रशासनाचा पक्षपात? सर्वपक्षीय मोर्चा आज
रोखठोक न्यूज अंबाजोगाई | प्रतिनिधी
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, वकिल व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे शहराध्यक्ष अॅड. इस्माईल गवळी यांना सुरक्षा रक्षकांनी घेरून बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणात मारहाण झालेल्या गवळी यांच्यावरच शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवार दि. 25 मार्च रोजी घडलेल्या या घटनेनुसार, अॅड. गवळी हे रुग्णालयात कामानिमित्त गेले असता, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान एका रिक्षाचालकाला मारहाण करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी विचारणा केली असता, संतप्त सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावरच हल्ला चढवला. या मारहाणीत गवळी गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती शहरभर पसरताच विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी रुग्णालयात दाखल झाले. परिस्थिती तणावपूर्ण बनत असताना, पोलिस निरीक्षक शरद जोगदंड घटनास्थळी दाखल झाले व जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुरुवार दि. 26 मार्च रोजी अंबाजोगाई पोलिसांनी अॅड. गवळी व त्यांच्या 10 सहकाऱ्यांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान, अॅड. गवळी यांच्या फिर्यादीवरून सुरक्षा रक्षकांविरोधात कलम 324 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असला, तरी “पीडितालाच आरोपी बनवण्याचा” प्रकार झाल्याचा आरोप नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. या प्रकरणामुळे “राज्यात खरंच कायद्याचं राज्य आहे का?” असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
सुरक्षा बलावर दादागिरीचे आरोप कायम
स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात नियुक्त महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांकडून रुग्ण व नागरिकांशी गैरवर्तन केल्याच्या तक्रारी नवीन नाहीत. गेल्या काही वर्षांत अनेक मारहाणीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. यापूर्वी पत्रकार सतीश पाटेकर यांनाही अशाच प्रकारे मारहाण झाल्याचा आरोप आहे.
रुग्णालय प्रशासनाकडून सुरक्षा रक्षकांना योग्य वर्तनाबाबत कोणतेही मार्गदर्शन किंवा समुपदेशन होत नसल्याने त्यांची मुजोरी वाढल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
आज सर्वपक्षीय मोर्चा
या संपूर्ण प्रकरणाच्या निषेधार्थ अंबाजोगाईत आज सर्वपक्षीय मोर्च्याचे आयोजन करण्यात आले असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.
प्रश्न कायम :
मारहाण झालेल्यालाच आरोपी ठरवण्याची ही नवी पद्धत आहे का, की प्रशासनावर कुणाचा दबाव? अंबाजोगाईतील ही घटना आता राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.
