केजमध्ये ‘SIR’ मतदान जनजागृती कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मा.नगरसेवक कपिल मस्के यांच्या पुढाकारातून शेकडो नागरिकांची नोंदणी; मतदान यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी गर्दी
रोखठोक न्यूज वार्ताहर | केज
खा.बजरंग सोनवने यांच्या सूचनेनुसार केज शहरात ‘SIR’ मतदान जनजागृती व नोंदणी मोहिमेला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. फुलेनगर येथील रमाई चौक परिसरात मा. नगरसेवक कपिल मस्के यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कॅम्पमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या कॅम्पमध्ये फुलेनगर, आंबेडकर नगर, हाउसिंग कॉलनी, कामगार नगर, मोंढा परिसर, गोसिया मस्जिद परिसर, केजीएन नगर, रमाई नगर आणि जलाल नगर या भागांतील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या उपक्रमाचा लाभ घेत अनेकांनी आपली मतदान नोंदणी पूर्ण केली तसेच मतदान यादीत नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया पार पाडली.
नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे व मतदान ओळखपत्रासह उपस्थित राहून SIR अंतर्गत नोंदणी केली. विशेषतः तरुण मतदारांमध्ये या उपक्रमाबाबत उत्साह दिसून आला.
लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचा सहभाग महत्त्वाचा असल्याने अशा जनजागृती कॅम्पमुळे नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता वाढत असल्याचे मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले.

