हायवा-कार भीषण अपघात; कारला आग लागून माय-लेकरांचा होरपळून मृत्यू
मृत केज तालुक्याती साळेगावेयेथेा वास्तव्यास होते.
कापसी फाट्यावर हृदयद्रावक घटना • दशक्रियेला जात असताना काळाचा घाला
रोखठोक न्यूज बीड | प्रतिनिधी
बीड-अहिल्यानगर राज्य महामार्गावरील कापसी फाटा येथे शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण अपघात होऊन माय-लेकरांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. खडीने भरलेल्या भरधाव हायवा टिपरने कारला समोरासमोर जोरदार धडक दिल्यानंतर कारने पेट घेतल्याने ही दुर्घटना अधिकच भीषण ठरली.
या अपघातात ऋषिकेश श्रीहरी पुरी (वय २६) आणि त्यांच्या आई पुष्पा श्रीहरी पुरी (वय ५०) यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. पुरी कुटुंब मूळचे अंबाजोगाई तालुक्यातील भारज येथील असून सध्या केज तालुक्यातील साळेगाव येथे वास्तव्यास होते. नातेवाईकांच्या दशक्रिया विधीसाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हायवा आणि कार यांची धडक इतकी भीषण होती की कारमधील इंधनाचा स्फोट होऊन काही क्षणांतच कारने आगीचा भडका घेतला. कार अक्षरशः आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाली, त्यामुळे आत अडकलेल्या माय-लेकरांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र आगीचे रौद्ररूप इतके तीव्र होते की बचावकार्य करणे अशक्य ठरले. काही वेळातच दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची खात्री पटली.
या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या अपघातामुळे पुन्हा एकदा राज्य महामार्गावरील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
प्रश्न उपस्थित :
भरधाव जड वाहनांवर नियंत्रण कधी येणार? निष्पाप नागरिकांचे जीव अजून किती जाणार?
