• Mon. Jul 27th, 2026

अंबाजोगाईत MSF सुरक्षा रक्षकांविरोधात सर्वपक्षीय संताप; गवळींसह कार्यकर्त्यांवरील 353 गुन्हे मागे घेण्याची मागणी महामोर्चातून प्रशासनाला इशारा • अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे निलंबित करा, खाजगी सुरक्षा हटवा

Bybaba maske

Mar 27, 2026

अंबाजोगाईत MSF सुरक्षा रक्षकांविरोधात सर्वपक्षीय संताप; गवळींसह कार्यकर्त्यांवरील 353 गुन्हे मागे घेण्याची मागणी

महामोर्चातून प्रशासनाला इशारा • अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे निलंबित करा, खाजगी सुरक्षा हटवा

रोखठोक न्यूज | अंबाजोगाई प्रतिनिधी

अंबाजोगाई शहरात स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय (SRT) तसेच पोलिस प्रशासनाच्या विरोधात आज सर्वपक्षीय महामोर्चा काढण्यात आला. रुग्णालयातील (MSF) सुरक्षा रक्षकांच्या कथित दादागिरीविरोधात संतप्त झालेल्या विविध पक्ष व संघटनांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली.

या निवेदनात संबंधित सुरक्षा रक्षकांना तात्काळ बडतर्फ करावे, रुग्णालयातील खाजगी सुरक्षा कंत्राट रद्द करावे, तसेच अ‍ॅड. इस्माईल गवळी, शेख रमीज आणि दिलीप पवार यांच्यावर दाखल करण्यात आलेले IPC 353 अंतर्गत गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली.

निवेदनानुसार, 23 मार्च रोजी रुग्णालय परिसरात एका रिक्षाचालकाला सुरक्षा रक्षकांकडून मारहाण होत असताना त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या अ‍ॅड. इस्माईल गवळी व सामाजिक कार्यकर्ते शेख रमीज यांच्यावर सुमारे 15 सुरक्षा रक्षकांनी घेरून बेदम मारहाण केली. या घटनेत गवळी यांचे डोके फुटले, तर शेख रमीज यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. घटनेचे चित्रीकरण करणारे दिलीप पवार यांनाही मारहाण करून त्यांचा मोबाईल हिसकावून व्हिडिओ डिलीट केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात जखमी झालेल्यांवरच शासकीय कामात अडथळा आणल्याचा IPC 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने संताप अधिकच तीव्र झाला आहे. “पीडितांनाच आरोपी बनवण्याचा प्रकार असह्य असून तात्काळ दुरुस्ती झाली पाहिजे,” असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.

अधिष्ठात्यांवर कारवाईची मागणी

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे व सहायक अधिष्ठाता डॉ. राकेश जाधव यांच्यावर निष्क्रियता व कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करत त्यांना पदावरून हटवून निलंबित करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.

मोर्चात प्रमुख नेत्यांची उपस्थिती

या सर्वपक्षीय महामोर्चात माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष अमर भैया देशमुख, व्यंकटेश चामनार (माजी उपनगराध्यक्ष), शेख रहीम (जिल्हाध्यक्ष, भीमशक्ती संघटना),गोविंद मस्के ( शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी)राजेश भाऊ वावळे (लोक जनशक्ती पार्टी), नगरसेवक मोईन शेख, उपनगराध्यक्ष दिनेश भराडिया, मनसे तालुकाध्यक्ष सुनील जगताप, अॅड. शिवाजीराव कांबळे (समाजवादी पक्ष) यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

इशारा :

मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास अंबाजोगाईत तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.

प्रश्न कायम :

रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांची मुजोरी कधी थांबणार? आणि पीडितांवरच गुन्हे दाखल करण्याची ही पद्धत बदलणार का? अंबाजोगाईतील हा प्रश्न आता अधिकच गंभीर बनत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!