केज नगरपंचायतची तंतरली का ?
मोहन गुंड यांचे उपोषण तिसऱ्या दिवशी; १ लाखाच्या बक्षीसाची चर्चा जोरात
रोखठोक न्यूज वार्ताहर | केज
केज शहरातील केज नगरपंचायत समोर सुरू असलेल्या मोहन गुंड यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस उलटून गेला असला, तरीही नगरपंचायत प्रशासन, तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेतलेली दिसून येत नाही. या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मोहन गुंड यांनी मांडलेले मुद्दे जर निराधार असतील, तर ते तत्काळ खोडून काढणे ही प्रशासनाची जबाबदारी होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून नगरपंचायतीकडून एकही मुद्दा स्पष्टपणे फेटाळण्यात आलेला नाही. यामुळे “कुठेतरी पाणी मुरतंय का?” असा संशय नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
दरम्यान, शहरात आता एक वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. काही नागरिकांच्या मते, नगरपंचायतीने १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करून किंवा ठोस पुरावे सादर करून हा वाद संपवावा. मात्र, याबाबतही प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.
विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणात सत्ताधारी पदाधिकारी तसेच नगरपंचायत प्रशासन पूर्णपणे शांत असल्याचे चित्र आहे. उपोषणाकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवली जात असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत चालली आहे.
उपोषणाचा कालावधी वाढत असताना, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन परिस्थिती स्पष्ट करणे गरजेचे आहे. अन्यथा, जनतेचा रोष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

