“भ्रष्टाचार सिद्ध करा, १ लाख बक्षीस घ्या” — केज नगराध्यक्षांना व सर्वेसर्वाच्या थेट आव्हानाला अहवान.
भ्रष्टाचाराच्या १४ मागण्यांसह मोहन गुंड यांचे अन्नत्याग आंदोलन; एकाच कामाचे दोनदा बिल काढल्याचा आरोप.
रोखठोक न्यूज वार्ताहर केज
“केज नगरपंचायतीतील भ्रष्टाचार दाखवा आणि एक लाख रुपयांचे बक्षीस घ्या,” असा दावा करणाऱ्या नगराध्यक्षांना व सर्वेसर्वा यांना आता थेट आव्हान दिले जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते मोहन गुंड हे नगरपंचायत कार्यालयासमोर १४ ठोस मागण्यांसह अन्नत्याग आंदोलन करत असून, त्यांच्या आरोपांमुळे प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मोहन गुंड यांनी मांडलेल्या मागण्यांमध्ये केवळ सामान्य तक्रारी नसून, थेट नगराध्यक्षांच्या कारभारावर बोट ठेवणारे गंभीर आरोप आहेत. विविध विकासकामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार, अपारदर्शकता आणि नियमभंग झाल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे.
नगरपंचायतीत करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांबाबत मोठा घोटाळा उघड होत असल्याचा दावा केला जात आहे. एकाच रस्त्याचे काम वेगवेगळ्या नावाने दाखवून दोनदा बिल काढल्याचे दस्तऐवजांतून दिसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे “हा भ्रष्टाचार नाही का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
गेल्या चार वर्षांपासून मोठमोठ्या घोषणा करत जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे. प्रत्यक्षात कामांपेक्षा कागदोपत्री आकडेच जास्त असल्याचे चित्र समोर येत असल्याचा दावा आहे.
या संपूर्ण प्रकरणावर “रोखठोक न्यूज”ने सातत्याने प्रकाश टाकत भ्रष्ट कारभाराची पोलखोल केल्याचा उल्लेख आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे आता प्रशासनावर उत्तरदायित्वाची वेळ आली आहे.
आता नगराध्यक्षांच्या “भ्रष्टाचार दाखवा, बक्षीस घ्या” या घोषणेनंतर प्रत्यक्ष आरोपांसह उपोषण सुरू असताना प्रशासनाची भूमिका काय असेल, याकडे केजकरांचे लक्ष लागले आहे.
