• Sat. Apr 18th, 2026

केजमध्ये तीव्र पाणीटंचाई; सत्ताधारी मतांच्या राजकारणात मग्न, प्रशासनही बघ्याची भूमिका!  घरकुल घोटाळ्याच्या गदारोळात नागरिक तहानलेले; मुख्याधिकारी अजित ढोपे यांच्यावर निष्क्रियतेचे आरोप

Bybaba maske

Apr 1, 2026

केजमध्ये तीव्र पाणीटंचाई; सत्ताधारी मतांच्या राजकारणात मग्न, प्रशासनही बघ्याची भूमिका!

 घरकुल घोटाळ्याच्या गदारोळात नागरिक तहानलेले; मुख्याधिकारी अजित ढोपे यांच्यावर निष्क्रियतेचे आरोप

रोखठोक न्यूज वार्ताहर 

केज शहरात दिवसेंदिवस पाणीटंचाईची समस्या तीव्र होत असताना सत्ताधारी लोकप्रतिनिधी मतांच्या राजकारणात गुंतलेले दिसत आहेत, तर प्रशासनही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. घरकुल घोटाळ्यामुळे आधीच केज नगरपंचायत राज्यभर चर्चेत असताना, आता पाणी प्रश्नाने नागरिकांचे हाल अधिकच वाढले आहेत.

शहरातील अनेक भागांमध्ये मागील दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. कधी वीज बिल थकबाकीमुळे, तर कधी पाईपलाईन नादुरुस्त असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सुमारे ४० ते ५० टक्के नागरिकांना उन्हाळ्यात विकतचे पाणी घेऊन गुजराण करावी लागत असल्याची परिस्थिती आहे.

दरम्यान, उमरी रोडवरील गणेश नगर परिसरातील नगरपंचायतीच्या मालकीच्या बोअरवर एका रहिवाशाने बेकायदेशीर ताबा घेतल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक बोअरवरील हातपंप काढून टाकून त्या ठिकाणी मोटार बसवून पाण्याचा वापर केवळ स्वतःपुरता मर्यादित केल्याचा आरोप आहे. याबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही.

नागरिकांनी दोन महिन्यांपूर्वी लेखी तक्रार करूनही मुख्याधिकारी अजित ढोपे यांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. वारंवार विचारणा करूनही “आज करतो, उद्या करतो” अशा उत्तरांमुळे नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. त्यामुळे आता रहिवासी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याच्या तयारीत आहेत.

विशेष म्हणजे, संबंधित प्रभागातील लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष आणि नगरसेविकांकडेही अनेकदा तक्रारी करण्यात आल्या, मात्र त्याकडेही दुर्लक्षच करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे “लोकप्रतिनिधींना मतांचे राजकारण करायचे आहे, पण प्रशासनाचे काय?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

एकीकडे घरकुल घोटाळ्याची चौकशी सुरू असून, दुसरीकडे शेकापचे भाई मोहन गुंड यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. एवढ्या गंभीर घडामोडी घडत असतानाही ना सत्ताधाऱ्यांना जाग येत आहे, ना प्रशासन हलताना दिसत आहे.

नागरिकांचा इशारा :

पाणी प्रश्न तात्काळ सोडवा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल!

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!