केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन
कार्यक्षम, मनमिळाऊ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तत्परतेने काम करणारा अधिकारी हरपला
रोखठोक न्यूज वार्ताहर
केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज सकाळी लातूर–अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन झाले. स्वतःच्या कारने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, कारमध्ये ते एकटेच होते. गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटून वाहन पलटी झाल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज रेणापूर पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
राकेश गिड्डे हे केवळ प्रशासकीय अधिकारी नसून कामात तत्पर, मनमिळाऊ आणि जनतेच्या प्रश्नांप्रती संवेदनशील अधिकारी म्हणून ओळखले जात होते. विशेषतः शेतकऱ्यांच्या वादांमुळे बंद असलेले तालुक्यातील अनेक रस्ते त्यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून मोकळे करून दिले होते. सामान्य नागरिकांच्या अडचणी तत्परतेने सोडविणारा अधिकारी म्हणून त्यांनी अल्पावधीतच जनमानसात वेगळी ओळख निर्माण केली होती.
एका कार्यक्षम, तरुण आणि लोकाभिमुख अधिकाऱ्याच्या अशा अकाली जाण्याने महसूल प्रशासनासह संपूर्ण केज तालुक्यावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

