• Fri. Oct 23rd, 2026

अंबाजोगाईत घरफोडीचा पर्दाफाश; 27 तोळे सोने, 858 ग्रॅम चांदी जप्त!50 हून अधिक CCTV फुटेज तपासून पोलिसांनी आवळल्या चोरट्यांच्या मुसक्या; दोघे जेरबंद, एक फरार

Bybaba maske

Sep 26, 2026

अंबाजोगाईत घरफोडीचा पर्दाफाश; 27 तोळे सोने, 858 ग्रॅम चांदी जप्त!

50 हून अधिक CCTV फुटेज तपासून पोलिसांनी आवळल्या चोरट्यांच्या मुसक्या; दोघे जेरबंद, एक फरार

रोखठोक न्यूज | अंबाजोगाई प्रतिनिधी

अंबाजोगाई शहरातील बंद घराचे कुलूप तोडून तब्बल 53 तोळे सोन्याचे दागिने, पावणेदोन किलो चांदी आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने छडा लावला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून 27 तोळे (270 ग्रॅम) सोने आणि 858 ग्रॅम चांदीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोजी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे दरवाजे तोडून घरात प्रवेश केला आणि सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी गु.र.नं. 391/2026 अन्वये कलम 331(3), 331(4), 3(5) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

50 पेक्षा जास्त CCTV फुटेज तपासले

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत होते. पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पथकाला तपासाबाबत मार्गदर्शन केले. पोलिसांनी अभिलेखावरील गुन्हेगारांची माहिती तपासण्यासोबतच परिसरातील 50 पेक्षा अधिक CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले.

याच तपासात एका CCTV फुटेजमध्ये तीन संशयित दुचाकीवरून जाताना पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली.

परळी परिसरात पोलिसांचा सापळा

दरम्यान, 25 सप्टेंबर 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत या घरफोडीमागे अमर काकासाहेब थोरात व त्याचे दोन साथीदार असल्याची माहिती मिळाली. चोरी केलेले सोने विक्रीसाठी नेले जाणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी परळी परिसरात सापळा रचला.

मोठ्या शिताफीने अमर काकासाहेब थोरात (वय 23, रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने साथीदाराचे नाव जगजीतसिंग अचलसिंग दुधानी (वय 32, रा. शिवाजी चौक, परळी) असे सांगितले. पोलिसांनी दुधानी यालाही ताब्यात घेतले.

तिसरा साथीदार फरार; युनिकॉर्न दुचाकीचा वापर

तपासादरम्यान या गुन्ह्यात मंगलसिंग हिरासिंग बावरी याचाही सहभाग असल्याचे समोर आले. घरफोडीसाठी त्याची युनिकॉर्न मोटारसायकल वापरण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तिघांनी मिळून गुन्हा केल्याचे पोलिसांनी सांगितले असून मंगलसिंग बावरी सध्या फरार आहे. त्याचा अंबाजोगाई शहर पोलीस शोध घेत आहेत.

27 तोळे सोने आणि 858 ग्रॅम चांदी हस्तगत

पोलिसांनी आरोपींकडून घरफोडीतील 27 तोळे म्हणजेच 270 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 858 ग्रॅम चांदीचे दागिने असा मुद्देमाल जप्त केला आहे. उर्वरित मुद्देमाल आणि फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

ताब्यात घेतलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची कामगिरी

ही कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक बीड समीर शेख आणि सहायक पोलीस अधीक्षक अंबाजोगाई ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, शरद जोगदंड, PSI सुशांत सुतळे, पोलीस हवालदार रामचंद्र केकान, मारोती कांबळे, विष्णु सानप, गोविंद भताने, अर्जुन यादव, विकास राठोड, सचिन आंधळे, अश्विनकुमार सुरवसे, गोविंद राख, चालक अतुल हराळे तसेच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यातील पांडुरंग काळे व हनुमंत चादर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

रोखठोक न्यूज — जनसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!