ग्रामसेवक, उपसरपंचांकडून कथित अनधिकृत आर्थिक लूट!
चनई ग्रामपंचायतीतील कारभाराची चौकशी करून निलंबनाची मागणी; कारवाई न झाल्यास ८ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण
रोखठोक न्यूज | अंबाजोगाई
अंबाजोगाई तालुक्यातील चना ग्रामपंचायतीमध्ये कर वसुली आणि विविध शासकीय निधीच्या खर्चाबाबत गंभीर आरोप करण्यात आले असून, या प्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी करून संबंधित ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाईच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत उपजिल्हाधिकारी कार्यालय, अंबाजोगाई यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनानुसार, ग्रामसेवक लक्ष्मण महादेव देशमाने व उपसरपंच यांच्यावर ग्रामपंचायतीच्या विविध करांच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांकडून कथितरीत्या अनधिकृत रक्कम वसूल केल्याचा आरोप आहे. विशेषतः PTR नोंदणी व फेरफारच्या नावाखाली प्रति प्लॉट ₹५ हजार ते ₹१० हजारांपर्यंत रक्कम मागितली जात असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
ले-आऊटचे अधिकृत चलन शासनाकडे भरलेले असतानाही पुन्हा प्रत्येक प्लॉटची ग्रामपंचायतीमध्ये नोंद करण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच वीज व पाणीपुरवठा उपलब्ध नसतानाही कराच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
रेडी रेकनर मूल्यांकनाच्या केवळ १ टक्के रकमेऐवजी हजारो रुपये फेरनोंदणीसाठी घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला असून, या संपूर्ण प्रकाराची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मागासवर्गीय निधीसह विविध योजनांच्या खर्चावरही प्रश्नचिन्ह
चनई ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातील मागासवर्गीयांच्या विकासासाठी नियमानुसार खर्च होणे अपेक्षित असलेल्या निधीचा मागील ८ ते १० वर्षांत योग्य वापर झाला नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच आंतरजातीय विवाहासाठीचे अर्थसाहाय्य, दिव्यांगांसाठीचा निधी, रमाई आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील निधीबाबतही चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
काही घरकुलांचे बांधकाम पूर्ण न करताही लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला असून, या सर्व बाबींची कागदपत्रांसह सखोल तपासणी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
‘खोट्या गुन्ह्यांची धमकी’ दिल्याचाही आरोप
ग्रामपंचायतीतील कथित अनधिकृत वसुलीबाबत विचारणा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींना ग्रामसेवक आणि उपसरपंचांकडून अरेरावीची भाषा वापरली जाते. कलम ३५३ किंवा खंडणीचे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.
या सर्व आरोपांची सत्यता तपासण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नियुक्त करावी, संबंधित ग्रामसेवक व उपसरपंच यांच्याविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी आणि दोष आढळल्यास गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
कारवाई न झाल्यास ८ ऑक्टोबर २०२६ पासून उपजिल्हाधिकारी कार्यालय, अंबाजोगाईसमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाईच्या वतीने देण्यात आला आहे.
वरील आरोप निवेदनात करण्यात आलेले असून, त्यांची स्वतंत्र शासकीय चौकशी होणे बाकी आहे. संबंधित ग्रामसेवक, उपसरपंच किंवा ग्रामपंचायतीची अधिकृत बाजू उपलब्ध झाल्यास तीही प्रसिद्ध केली जाईल.
रोखठोक न्यूज, जनसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज
