केज तालुक्यात खड्ड्याचा बळी! कारचा भीषण अपघात; एक तरुण जागीच ठार, दुसरा गंभीर
बरड फाटा परिसरात मृत्यूचा सापळा; दोन दिवसांत दोन भीषण अपघात, महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिक संतप्त
रोखठोक न्यूज वार्ताहर | केज
केज : अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे आता वाहनचालकांच्या जीवावर उठले आहेत! केज तालुक्यातील बरड फाटा परिसरात रस्त्यावरील खड्ड्यामुळे कारचा भीषण अपघात होऊन चाकरवाडी येथील अशोक मोरे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर पिंपळगाव येथील कृष्णा गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत. एकाच परिसरात दोन दिवसांच्या अंतराने घडलेल्या दोन भीषण अपघातांत चार जणांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर महामार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
खड्ड्यामुळे कारवरील नियंत्रण सुटले; गाडीचा चक्काचूर
मिळालेल्या माहितीनुसार, चाकरवाडी येथील अशोक मोरे आणि पिंपळगाव येथील कृष्णा गायकवाड हे दोघे कारने अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावरून प्रवास करत होते. बरड फाटा परिसरात रस्त्यावरील खड्ड्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारचा भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या दुर्घटनेत अशोक मोरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर कृष्णा गायकवाड गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. कृष्णा गायकवाड यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कालच याच परिसरात तिघांचा मृत्यू; आता पुन्हा अपघात
विशेष म्हणजे, याच परिसरात दोन दिवसांपूर्वी पिकअप आणि टिप्पर यांच्यात भीषण अपघात झाला होता. त्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता, तर चार ते पाच गुरेही दगावली होती. या घटनेची चर्चा सुरू असतानाच पुन्हा एका तरुणाचा बळी गेल्याने महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
प्रशासन आणखी किती बळींची वाट पाहणार?
अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची तक्रार आहे. बरड फाटा परिसरात सलग अपघात घडत असताना संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
खड्डे बुजवणार कधी? धोकादायक ठिकाणी इशारा फलक लावणार कधी? आणखी किती निष्पाप जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असा संतप्त सवाल वाहनचालक आणि नागरिक उपस्थित करत आहेत.
महामार्गावरील धोकादायक खड्डे तातडीने बुजवावेत, अपघातप्रवण ठिकाणी योग्य दिशादर्शक व इशारा फलक लावावेत आणि रस्त्याची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
रोखठोक न्यूज — जनसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज!
