• Sun. Apr 19th, 2026

खाजगी एजंटामार्फत सात हजार रुपये स्वीकारणाऱ्या तलाठ्यावर लाचलुचपतने केली कारवाई 

Bybaba maske

Sep 26, 2022

खाजगी एजंटामार्फत सात हजार रुपये स्वीकारणाऱ्या तलाठ्यावर लाचलुचपतने केली कारवाई 

  1. अंबाजोगाई दि.२६ ( प्रतिनिधी ) शहरात पुन्हा लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे. नव्याने खरेदी केलेल्या प्लॉटची सातबारा व फेरफार नोंद घेण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागणी करून एजंटामार्फत सात हजार रुपये स्वीकारणाऱ्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. अंबाजोगाई येथे दि.२६ सप्टेंबर सोमवार रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.प्रफुल्ल सुहासराव आरबाड वय ३० वर्षे असे तलाठ्याचे नाव असून, एजंट नजीरखान उमरद राजखान पठाण, यालाही बेड्या ठोकल्या आहेत. आरबाड हा अंबाजोगाई सज्जाचे तलाठी आहे. एका व्यक्तीने प्लॉट खरेदी केलेला आहे. त्याची सातबारा व फेरफार नोंद घेण्यासाठी तलाठी आरबाडने २३ सप्टेंबर रोजी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर सात हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाले. तक्रादाराने लाचलुचपत विभाग बीड यांचे कार्यालयात धाव घेतली. त्याच दिवशी लाच मागणी पडताळणी केली.
  2. दि.२६ सप्टेंबर सोमवार रोजी सायंकाळी एका बिअर बारच्या मागे एजंटासह तलाठी आरबाड दुचाकीवर आला. तक्रारदारास तलाठ्याने नजीरखान पठाणकडे पैसे देण्यास सांगितले. त्याने रक्कम स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोघांनाही झडप मारून पकडले. शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर कारवाई उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक अमोल धस, अंमलदार भरत गारदे, अविनाश गवळी, संतोष राठोड,चालक गणेश म्हेत्रे यांनी ही कारवाई केली.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!