कोरेगाव अपघात प्रकरणी स्वतःसह तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला म्हणून मृत मोटारसायकल स्वारावर गुन्हा दाखल
गौतम बचुटे/केज :- केज -बीड रोडवर कोरेगाव जवळ झालेल्या मोटार सायकल व स्कुल बसच्या अपघातात मोटार सायकलवरील तिघे मृत्यू पावले होते. त्या प्रकरणी स्कुल बसच्या चालकाच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मोटार सायकलस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी माहिती अशी की, दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी २:०० च्या दरम्यान केज-बीड रोडवर कोरेगाव जवळ एका उभ्या स्कुल बसला क्र.( एम एच ४४/९९९६) मोटार सायकलीने क्र.(एम एच १३/ बी जे- ८५७४) धडक देऊन झालेल्या अपघातात दिपक कल्याण पवार, भागवत कल्याण पवार दोघे रा. कोरेगाव आणि सुनिल मधुकर शिंदे रा. पिंपळगांव या तिघांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान दि. २६ सप्टेंबर २०२२ रोजी स्कुल बसचा चालक विलास संदीपान पाळवदे रा. सासुरा ता. केज यांच्या फिर्यादीवरून मोटार सायकल चालक दीपक कल्याण याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ४३६/२०२२ भा. दं. वि. २७९, ३०४ (अ), ४२७,१७७, १८४ नुसार तो स्वतः आणि इतर दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आंनद शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.
तळटीप :अपघात स्थळाच्या फोटो वरून अपघातग्रस्त बस ही रस्त्यावरील दुचाकींच्या वाहतुकीसाठी असलेल्या लेनमध्ये उभी असल्याचे दिसून येते. या मुळे सदर बस आणि तिच्या चालका विरुद्ध निष्काळजीपणे वाहन रस्त्यात उभे करून तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल का झाला नाही? अशीही चर्चा सुरू आहे.