केज प्रतिनिधी :- केज -बीड रोडवर कोरेगाव जवळ झालेल्या मोटार सायकल व स्कुल बसच्या अपघातात मोटार सायकलवरील तिघे मृत्यू पावले होते. त्या प्रकरणी स्कुल बसच्या चालकाच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मोटार सायकलस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी माहिती अशी की, दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी २:०० च्या दरम्यान केज-बीड रोडवर कोरेगाव जवळ एका उभ्या स्कुल बसला क्र.( एम एच ४४/९९९६) मोटार सायकलीने क्र.(एम एच १३/ बी जे- ८५७४) धडक देऊन झालेल्या अपघातात दिपक कल्याण पवार, भागवत कल्याण पवार दोघे रा. कोरेगाव आणि सुनिल मधुकर शिंदे रा. पिंपळगांव या तिघांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान दि. २६ सप्टेंबर २०२२ रोजी स्कुल बसचा चालक विलास संदीपान पाळवदे रा. सासुरा ता. केज यांच्या फिर्यादीवरून मोटार सायकल चालक दीपक कल्याण याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ४३६/२०२२ भा. दं. वि. २७९, ३०४ (अ), ४२७,१७७, १८४ नुसार तो स्वतः आणि इतर दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पण प्रश्न असा निर्माण होत आहे बस चालकाने बस जर थांबवली होती तर त्याची पार्किंग लाईट,इंडीकेटर चालु होते का?पाठी माघून कोणती गाडी येते का याचा अंदाज घेतला होता का?अपघात स्थळाच्या फोटो वरून अपघातग्रस्त बस ही रस्त्यावरील दुचाकींच्या वाहतुकीसाठी असलेल्या लेनमध्ये उभी असल्याचे दिसून येते. या मुळे सदर बस आणि तिच्या चालका विरुद्ध निष्काळजीपणे वाहन रस्त्यात उभे करून तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल का झाला नाही? अशीही चर्चा सुरू आहे. तसेच अपघातग्रस्त दोन वाहनांपैकी साधारणतः मोठ्या वाहनावर गुन्हा दाखल झाल्याचे उदाहरणे आहेत.तसेच स्कुलबस चा नंबर आरटीओ च्या वेबसाईटवर टाकले असता कोणतीच माहीती मिळून येत नाही ती कशी? या प्रश्नावरील उत्तरे मिळतील का?असे जनतेतून आवाज येत आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आंनद शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.