भर पावसात सहाय्यक पोलीस निरीक्षक नदी काठच्या गावात
गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे आणि कोणतीही दुर्घटना घडू नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी या साठी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी बानेगाव, आरणगाव, लाखा, राजेगाव, भोपला, बोरगाव, पिंपरी, वरपगाव, हदगाव येथे पडत्या पावसात जाऊन नागरिकांना सावध राहण्यासाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
केज तालुक्यात संततधार पावसाने नदी, नाले व ओढे येथील पाणी पातळीत वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क आवश्यक आहे. ज्यांना पोहता येत नाही त्यांनी खोल पाण्यात जाऊ नये. जेथे धोकादायक पूल आहे असे गावातील नागरिकांनी संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून दुरुस्तीसाठी पाठपुरावा करावा.
सरपंच, लोकप्रतिनिधी मदतीने सार्वजनिक बांधकाम विभागास लेखी पाठपुरावा करून सदर पूल दुरुस्त करून घ्यावा. गावातील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसुरक्षा दल सदस्य व तरुण मुलांनी एक व्हाट्स अप ग्रुप बनवावा. जेणे करून गावात कोठेही पाऊस व इतर कारणाने काही अनुचित घटना घडल्यास तात्काळ सर्व गावकऱ्यांना व पोलीस प्रशासनास माहिती मिळेल. वेळीच एकमेकांना मदत करता येईल. कोणताही अनुचित प्रकार किंवा घटना घडल्यास किंवा काही मदत लागल्यास तात्काळ खालील संबंधित अधिकारी किंवा बीट अंमलदार यांना संपर्क करावा. आणीबाणीच्या प्रसंगी अधिकारी कर्मचारी, आणि संकट समयी मदतीला येणाऱ्याचे व्हाट्सअप ग्रुप तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच नागरिकांनी अडीअडणीच्या प्रसंगी (०२४४५) २२९५१०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या सोबत बिट जमादार राजू गुंजाळ, चंद्रकांत काळकुटे, हनुमंत गायकवाड, दिलीप गित्ते हे सोबत होते.