तुकाराम मुंडे जिल्ह्य़ात येणार, आरोग्य यंत्रणेची धावाधाव
रोखठोक वार्ताहर
राज्याच्या आरोग्य विभागाची सूत्र हाती घेतल्यानंतर आपल्या निर्णयामुळे चर्चेत आलेले आयुक्त तुकाराम मुंढे हे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीपासून बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.दोन दिवसांच्या दौऱ्यात मुंढे हे वेगवेगळ्या रुग्णालयांना भेटी देऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेणार आहेत.त्यामुळे कामचुकार आरोग्य कर्मचाऱ्यांची दिवाळी कडू होणार हे नक्की.
जिल्हाधिकारी असो की विभागीय आयुक्त अथवा आरोग्य विभागाचे आयुक्त नेहमीच आपल्या कार्यशैलीमुळे चर्चेत असणारे तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागाचा पदभार घेतल्यानंतर ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य सुधारण्यावर भर दिला आहे.
आरोग्य विभागाची सूत्र घेतल्यानंतर त्यांनी सर्वच जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना भेटी देण्याचे आदेश दिले.यामध्ये रात्री अकरा ते पहाटे सातवाजेपर्यंत किमान एक वैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी असावा अन्यथा कारवाई करण्याचे आदेश दिले.
दरम्यान आता तुकाराम मुंढे हे 25 आणि 26 ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.त्यांच्या या दौऱ्यात ते शासकीय रुग्णालयात आणि ग्रामीण भागातील रुग्णालयात जाऊन तपासणी करणार आहेत.24 रोजी दिवाळी सुरू होत असून 22 पासून सर्व कर्मचारी सुट्टीवर असणार आहेत.मात्र आता मुंढे यांचा दौरा आल्याने कामचुकार कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे.
