दोन मोटारसायकलवरून आलेल्या सहा जणांनी विद्यार्थ्यांसह सोबतच्या मित्राला वाटेत अडवून मारहाण केली. या वेळी त्यांच्याकडील मोबाइल जबरदस्तीने हिसकावत पळ काढल्याची घटना लातुरातील नारायणनगर भागात घडली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी प्रवीण महादेव कांदे (वय २०, रा. तांबवा, ता. केज, जि. बीड) हा आपल्या मित्रासोबत अभ्यासिकेतून आपल्या खोलीकडे जात होता.
दरम्यान, नारायणनगर भागात मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्यांना वाटेतच अडवले. तुमच्याकडे किती पैसे व मोबाइल आहेत? असे विचारले. ते आम्हाला द्या, म्हणून फिर्यादी आणि त्याच्या मित्राला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या वेळी फिर्यादीच्या हातातील मोबाइल जबरदस्तीने हिसकावत काढून घेतला. त्याचबरोबर घटनास्थळावरुन पलायन केले. ही घटना लातुरातील नारायणनगर भागात १४ नोव्हेंबर रोजी घडली. शिवाजीनगर ठाण्यात एकूण सहा जणांविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला.