डीएडचे शिक्षण घेऊन शिक्षकाची नोकरी लागत नसल्याने बेरोजगारीला कंटाळून एका ३४ वर्षीय तरुणाने राहत्या घरातील अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील काळेगावघाट येथे घडली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
केज तालुक्यातील काळेगावघाट येथील दयानंद हरिश्चंद्र गाताडे ( वय ३४ ) या तरुणाने डीएडचे शिक्षण घेऊन तो शिक्षक पदाच्या नोकरीसाठी प्रयत्न करीत होता. मात्र नोकरी लागत नसल्याने हताश झाला होता. शेवटी बेरोजगारीला कंटाळून दयानंद गाताडे याने टोकाची भूमिका घेत ९ जानेवारी दुपारी घरी कोणी नसताना घरातील लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच चिंचोली माळी बिटचे जमादार राजू गुंजाळ, पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. मंगळवारी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर दयानंद गाताडे याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अविनाश रामचंद्र गाताडे यांच्या खबरेवरून केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.