केजमध्ये शेतीच्या वादावरून भाऊ बंदकीचा थरार ! चुलत्याने पुतण्याच्या डोक्याला पिस्तुल लावून तोंडावर ॲसिड फेकले !
रोखठोक न्युज
गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यात शेतीच्या वादातून चुलत्याने पुतण्याच्या डोक्याला पिस्तुल लावून तोंडावर ॲसिड टाकून मारहाण केल्याची घटना केज येथे घडली आहे. या प्रकरणी आठ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:०० ते ७:०० वा च्या सुमारास राहुल रामहरी वायबसे हे हार्वेस्टर ऑपरेटर केज येथील मार्केट यार्ड मधून कोंबडीचे खाद्य रिक्षात टाकून घेऊन त्यांच्या सोबत मोटार सायकलने जात असताना मार्केट यार्डच्या कमानी जवळच्या साई फटाके सेंटर समोर त्याचे चुलते संभाजी आणि इतर हे त्यांची स्कॉर्पिओ गाडी उभी करून उभे होते. राहुल वायबसे त्यांच्या जवळून जाताच त्यांनी त्याला अडवून संभाजी वायबसे यांनी राहुल वायबसेच्या डोक्याला पिस्तुल लावले. त्याला जिवंत सोडणार नाही म्हणाला. तसेच प्रमोद डोईफोडे याने राहुल वायबसेच्या तोंडावर ॲसिड फेकले. प्रमोद म्हणाला की याला ॲसिडने काही होणार नाही याची कोयत्याने खांडोळी करा. यावेळी अश्विनी लक्ष्ण वायबसे व प्रमोद डोईफोडे यांची पत्नी यांच्या हातात लोखंडी कोयते होते. परंतु कोयत्याने अगर बंदुकीने कोणी मारले नाही. त्या घटने नंतर राहुल वायबसे हा दवाखान्यात न जाता घरी गेला. दि १२ रोजी जिल्हा रुग्णालय बीड येथे उपचारासाठी दाखल झाला.
उपचारा दरम्यान त्यांनी पोलीसांना दिलेल्या जबाबा वरून दि. १६ फेब्रुवारी रोजी केज पोलीस ठाण्यात सुदर्शन घुले, अजय तांदळे, सखाराम बन्सी कदम, लक्ष्मण किसन वायबसे, संभाजी महादेव वायबसे, प्रमोद बाबुराव डोईफोडे, अश्विनी लक्ष्मण वायबसे आणि प्रमोद डोईफोडे याची पत्नी या आठ जणांच्या विरुद्ध गु. र. नं. ९३/२०२३ भा. दं. वि. १४३ १४७ १४८, १४९, ३२४, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत