सिनेअभिनेता सोनू सूद च्या नावाने ऑनलाइन फ्रॉड ! अनेकाने केलेल्या आर्थिक मदतीवरच डल्ला.
रोखठोक न्युज वार्ताहर
आम्ही सोनू सुदच्या कार्यालयातून बोलत आहोत,तुम्हाला आर्थिक मदत द्यायची आहे अस सांगून जवळपास 70 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आधीच मुलाच्या मृत्यूचे दुःख अन त्यात सायबर गुन्हेगारांनी घातलेला ऑनलाइन गंडा यामुळे चौधरी कुटुंब अडचणीत सापडले आहे.
केज तालुक्यातील सावलेश्वर पैठणमध्ये तलावात बुडून एकाच कुटुंबातील 3 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे या कुटुंबाला अनेकांनी आर्थिक मदत केली होती. याच आर्थिक मदतीवर या भामट्यांनी ऑनलाईन गंडा घातल्याचे समोर आले आहे. बीडच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील पैठण येथे 21 मार्च रोजी जयराम हरिभाऊ चौधरी यांच्या मुलासह दोन पुतण्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला होता. चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने नातेवाईक, मित्र परिवारांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांना आर्थिक मदत केली. याच पैशांवर सायबर भामट्यांचा डोळा होता.
30 मार्च रोजी जयराम यांना सोनू सूद फाउंडेशन कार्यालयातून बोलत असल्याचा एक कॉल आला. “तुम्हाला 3 लाख रुपयांची मदत करायची असून मी विचारलेली माहिती सांगा, असे सांगण्यात आले. त्यांना मोबाइलमध्ये एनी डेस्क अँप डाऊनलोड करायला लावून पॅन कार्ड, आधार कार्ड, एटीएम कार्ड, बैंक पासबुक आदींची माहिती घेतली.
नंतर वेगवेगळे ओटीपी घेऊन त्यांच्या खात्यातून 10 हजार, 9 हजार 999, 18 हजार 321, 18 हजार 297, 5 हजार, 4 हजार 800 आणि 3 हजार 49 असे 69 हजार 566 रुपये ऑनलाइन काढून घेतले. पैसे कट झाल्याचे समजताच चौधरी यांनी परत त्याच क्रमांकावर कॉल केला. परंतु तो नंबर बंद होता. त्यावरुन आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चौधरी यांनी आगोदर युसूफवडगाव आणि नंतर सायबर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. दरम्यान याप्रकरणी सायबर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.