विद्युत तार तुटून नदीत पडल्याने पाणी पिण्यासाठी गेलेल्या दोन म्हशी ठार
रोखठोक न्युज
गौतम बचुटे/केज :– केज तालुक्यातील सांगवी (सारणी) येथे विद्युत तार तुटून ती नदीच्या पाण्यात पडल्याने विद्युत प्रवाह उतरल्याने पाणी पिण्यासाठी नदीवर गेलेल्या म्हशीला शॉक लागून दोन्ही म्हशी जागीच ठार झाल्या आहेत.
या बाबतची माहिती अशी की, सोमवार दि. ११ सप्टेंबर २०२३ रोजी विठ्ठल शिवाजी केदार हे शेतात म्हशी चारून सायंकाळी ६:०० वा सुमारास घराकडे येत असताना वाटेत असलेल्या बोभाटी नदीवर ते दोन्ही म्हशीला पाणी पाजण्यासाठी घेऊन गेले. दोन्ही म्हशी पाण्यात उतरल्या असता त्यांचा तडफडून मृत्यू झाला. त्या नंतर विठ्ठल केदार हे घाबरून गेले आणि त्यांनी अंदाज घेतला असता त्यांच्या असे निदर्शनास आले की, नदीच्या पाण्याचा डोहा जवळून जाणाऱ्या खांबा वरील विद्युत तार तुटून ती डोहात पडल्याचे त्यांना दिसले. विद्युत वाहक तार तुटून डोहात पडल्यामुळे वीज प्रवाह पाण्यात उतरून विजेचा शॉक लागून विठ्ठल केदार यांच्या दोन म्हशीचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी विठ्ठल केदार यांच्या फिर्यादी वरून दि. १२ सप्टेंबर रोजी विजेचा शॉक लागून आकस्मिक मृत्यू प्रकरणी आकस्मिक नं. ५/२०२३ नुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार सुधाकर दौंड हे पुढील तपास करीत आहेत.