कारने रस्ता ओलांडणाऱ्या महिलेस उडवले महिला जागीच ठार.
रोखठोक न्युज
हॉटेलवर स्वयंपाक करण्याचे काम करून घराकडे पायी निघालेल्या महिलेस भरधाव कारने जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना केज – मांजरसुंबा रस्त्यावरील कोरेगाव शिवारात शुक्रवारी ( दि. २७ ) रात्री घडली. रुक्मीणबाई साहेबराव शिनगारे ( वय ५५ रा. कोरेगाव ) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे.
कोरेगाव ( ता. केज ) येथील मयत रुक्मीणबाई साहेबराव शिनगारे ( वय ५५ ) यांच्या पतीचे सात वर्षापूर्वी निधन झाले होते. तर रुक्मीणबाई या केज – मांजरसुंबा रस्त्यावरील कोरेगाव शिवारातील आदिराज हॉटेलवर स्वयंपाकी म्हणून काम करून उपजीविका करीत होत्या. शुक्रवारी रात्री रात्री ८.३० ते ८.४५ वाजेच्या दरम्यान हॉटेलवरून काम आटपून घराकडे पायी निघाल्या असता या आदिराज हॉटेलच्या बाजूला केज – मांजरसुंबा रस्त्याने भरधाव वेगाने निघालेल्या कारने ( एम. एच. १४ सीएस ९०९२ ) त्यांना जोराची धडक दिल्याने या अपघातात रुक्मीणबाई शिनगारे यांच्या डोक्याला, तोंडाला, जबर मार लागून त्या जागीच मरण पावल्या. या घटनेची माहिती मिळताच बिट जमादार सुधाकर दौंड यांनी घटनास्थळी भेट देत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. मयत महिलेचा मुलगा कैलास साहेबराव शिनगारे यांच्या फिर्यादीवरून कार चालक परमेश्वर तुकाराम हांगे ( रा. हांगेवाडी ता. केज ) याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार सुधाकर दौंड करत आहेत.