‘मिनी सिझेरियन’ नंतरही गर्भ पोटातच ‘स्वाराती’मधील प्रकार, कुटुंबनियोजन शस्त्रक्रियाही, महिला अत्यवस्थ
■ ■ एकेकाळी आशिया खंडातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय असा लौकिक असलेल्या महाविद्यालयाला तज्ज्ञांची रिक्त पदे, यंत्रसामग्रीचा तुटवडा अशा समस्यांनी तर घेरले आहेच. मात्र, ज्या विभागात पुरेसे मनुष्यबळ आणि तज्ज्ञ आहेत, तिथेही असा गंभीर आणि रुग्णांच्या जिवाशी खेळाचा निष्काळजीपणाचे प्रकार प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडत आहेत.
सौजन्य दत्ता देशमुख साहेब
अंबाजोगाई ता. १२ : तिसऱ्या वेळी गर्भवती राहिलेल्या विवाहितेला गर्भ नको असल्याने ती अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात भरती झाली. आठ टाक्यांचे मिनी सिझेरियन (हिस्टेरोटॉमी) करून गर्भ काढला, कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रियाही झाली. मात्र, पुन्हा सव्वा महिन्यांनी तिच्या पोटात गर्भ तसाच असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणाच्या हद्दीची घटना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात समोर आली आहे.
अंबाजोगाई तालुक्यामधील एका गावातील रहिवासी असलेल्या महिलेला तिसऱ्यांदा झालेली गर्भधारणा नको होती. तसेच त्यांना कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रियाही करावयाची होती. त्यामुळे त्या ता. दोन डिसेंबर २०२३ रोजी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात भरती झाल्या. डॉक्टरांनी विविध तपासण्या करून ता. चार डिसेंबरला मिनी सिझेरियन (हिस्टेरोटॉमी) करून त्यांचा गर्भपात केला.
त्यानंतर कुटुंबनियोजनाची त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र, हा सर्व प्रकार कागदोपत्रीच झाला. गर्भ त्यांच्या पोटातच राहिला. त्यामुळे बुधवारी (ता.१०) रात्री त्यांना रक्तस्त्राव होऊ लागला.
गुरुवारी (ता.११) त्या पुन्हा स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात भरती झाल्यानंतर पुन्हा एकदा मिनी सिझेरियन करून या महिलेच्या पोटातील एक किलो वजनाचे व पूर्ण वाढ झालेले मृतअर्भक बाहेर काढले गेले. वैद्यकीय क्षेत्रात हा अत्यंत निष्काळजीपणाचा प्रकार असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग विभागाच्या तीन तज्ज्ञांसह एका साहाय्यकाने या शस्त्रक्रिया केल्याची नोंद त्यांच्या डिस्चार्ज कार्डवर आहे. रक्तस्त्रावामुळे प्रकृती अस्वस्थ झाल्याने महिलेवर अतिदक्षता विभागातही ठेवावे लागले.
▪️डॉ. गणेश तोंडगे, स्त्रीरोग विभाग, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई
गर्भपाताची प्रक्रिया करताना सोनाग्राफी पाहणे आवश्यक होते. गर्भपातानंतर पूर्ण पिशवी तपासायला हवी होती. याबाबत आपण संबंधितांकडे विचारणा केली तर जुळा गर्भ असल्यामुळे एक गर्भ पोटात राहिला असू शकतो, असे सांगितले आहे. याबाबत वरिष्ठांना कळविले जाईल. – डॉ. गणेश तोंडगे, स्त्रीरोग विभाग, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई
