• Sat. Apr 18th, 2026

तांबवा येथील विष्णू ओव्हाळ प्रकरणी दलित संघटनेचे निदर्शने गृह निर्माण संस्थेच्या अध्यक्ष दिलीप चाटे वरही गुन्हा दाखल करण्याची मागणी

Bybaba maske

Jan 30, 2024

तांबवा येथील विष्णू ओव्हाळ प्रकरणी दलित संघटनेचे निदर्शने

गृह निर्माण संस्थेच्या अध्यक्ष दिलीप चाटे वरही गुन्हा दाखल करण्याची मागणी

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- तांबवा येथील विष्णू ओव्हाळ यांचे घर पाडून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. त्या प्रकरणी सर्व दलित संघटनांनी एकत्र येत तहसील कार्यालयावर निदर्शने केली. फसवणूक करणाऱ्या गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्वपक्षीय निदर्शनात करण्यात आली.

केज तालुक्यातील तांबवा येथील विष्णू ओव्हाळ हे अंध आहेत. मागील दहा वर्षां पासून त्यांची पत्नी वंदना ओव्हाळ, मुले आनंद ओव्हाळ व मिलिंद ओव्हाळ यांच्यासह गायरान जमिनीत पत्र्याच्या डब्यात राहात आहेत. दि. २३ रोजी सायंकाळी ६:०० वा. च्या सुमारास त्यांच्या गावातील गावगुंड गोरख रावसाहेब लांब, चिंगुबाई बन्सी चाटे व सिंधुबाई अशोक चाटे यांनी विष्णू ओव्हाळ यांच्या घरावर हल्ला करून त्यांचे पत्र्याचे घर जमीनदोस्त करून नासधूस केली. अंध विष्णू ओव्हाळ यास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्याच्या शारीरिक व्यंगावरून शिवीगाळ करून त्याला हिनवले आणि त्याच्या कुटुंबाला जीवे मारून टाकू अशा धमक्या दिल्या.

सदर प्रकरणी अंध व्यक्तीच्या घराची नासधूस व जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण होवुनही गुन्हा दाखल करून न घेता पोलीस गुन्हेगारांना अभय देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करून अंध विष्णू ओव्हाळ यांच्यासह त्यांची पत्नी वंदना ओव्हाळ व मुले आनंद ओव्हाळ व मिलिंद ओव्हाळ हे हल्ला करून घराची नासधूस करणाऱ्या गावगुंडावर ॲट्रॉसिटी कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दि. २६ जानेवारी रोजी सायं. ७:३० वा पासून केज तहसील कार्यालया समोर कडाक्याच्या थंडीत आमरण उपोषणाला बसले होते. त्या नंतर दि. २७ जानेवारी रोजी अखेर आंदोलनाची दखल घेत पोलिसांनी आनंद ओव्हाळ यांच्या फिर्यादी वरून गोरख रावसाहेब लांब, चिंगुबाई बन्सी चाटे व सिंधुबाई अशोक चाटे यांच्या विरुद्ध गु. र. नं. ३४/२०२४ भा. दं. वि. ३२३, ४२७, ५०४, ५०६, ३४ आणि अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार कायदा कलम ३(१) (आर) (एस), ३ (२) (व्ही) (ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान उपोषणाला पाच दिवस उलटूनही गुन्हेगारांना अटक करण्यात आली नाही. तसेच गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष दिलीप चाटे आणि इतर यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावे म्हणून दि. ३० जानेवारी रोजी बाबासाहेब मस्के, भास्कर मस्के, सुनील हिरवे, गोपीनाथ ईनकर, कपिल मस्के, बाळासाहेब ओव्हाळ, व्यंकट हजारे, ईश्वर सोनवणे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह तहसील कार्यालया समोर निदर्शने केली.या प्रकरणी विष्णू ओव्हाळ यांच्या कडून सरकारी गायरान जमिनीच्या भूखंडाच्या बेकायदेशीर व्यवहार प्रकरणी भगवान बाबा गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष दिलीप चाटे यांनी विष्णू ओव्हाळ यांच्या कडून ५० हजार रु घेऊन त्यांची फसवणूक केली म्हणून त्यांनाही सहआरोपी करण्यात यावे. अशी तहसीलदार लक्ष्मण धस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!