युसुफवडगाव आणि नेकनूर हद्दीतील घरफोडीतील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद
गुन्हेगारकडून पाच तोळे दागिन्यासह ३ लाखाचा मुद्देमाल ताब्यात
रोखठोक न्युज
गौतम बचुटे/केज :- युसूफ वडगाव आणि नेकनूर येथील घरफोडी प्रकरणातील संशयित आरोपी राजाराम उर्फ बबन धोंडिराम बुधवाडे (रा.लातुर) चौसाळा ते पारगाव जाणारे बायपास रोडवरील हॉटेल शेतकरीवर येथे असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच आरोपीला बेड्या ठोकुन त्याच्याकडून पाच तोळे सोन्याचे दागिन्यासह ३ लाख रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला.
दि. २८ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घरफोडी सारखे गुन्हेगारांची माहिती काढत असताना पोलीस उपनिरीक्षक सुतळे यांना गोपनिय माहिती मिळाली की, नेकनुर व युसूफवडगाव येथे झालेल्या घरफोडया प्रकरणातील संबंधित संशयित आरोपी राजाराम उर्फ बबन धोंडिराम बुधवाडे (रा.लातुर) हा चौसाळा ते पारगाव जाणारे बायपास रोडवरील हॉटेल शेतकरी येथे आला आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक संतोष साबळे या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळवून पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार रामदास तांदळे, मारुती कांबळे, बाळकृष्ण जायभाये, राजु पठाण, अर्जुन यादव, सुशिला हजारे, देविदास जमदाडे, विक्की सुरवसे आणि अतुल हराळे या पोलीस पथकाने हॉटेल बळिराजा येथे टाकून शिताफीने राजाराम उर्फ बबन धोंडिराम बुधवाडे याला तांब्यात घेतले. त्याची विचारपुस केली असता त्याने चिंचपुर व चौसाळा येथील दोन घराचे कुलूप तोडून चोरलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली. पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण ३ लाख रु चा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला. या कामगिरी बद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
————————————————-
विविध पोलीस ठाण्यात घरफोडीचे एकूण १३ गुन्हे दाखल :- राजाराम उर्फ बबन धोंडिराम बुधवाडे याच्यावर
लातुर जिल्हयात ग्रामीण पोलिस ठाण्यात २, वाढवणा १, शिवाजी नगर १, रेणापुर १, उदगिर ग्राणिण १, विवेकानंद चौक १, एमआयडीसी १, गुन्हा असे एकुण घरफोडीच एकूण ८ गुन्हे आणि गुन्हे अहमदपुर १, निलंगा येथे १ आणि रस्त्यात अडवुन मारहाण करणे व दारुबंदीच २ असे १३ गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
