ॲट्रॉसिटी प्रकरणातील आरोपीं मोकाट, उलट पोलिसांनी बौद्ध समाजावरच दाखल केले दरोड्याचे गुन्हे
खोटे गुन्हे रद्द करा अन्यथा समाजाचा आंदोलनाचा इशारा
रोखठोक न्युज वार्ताहर
परळी प्रतिनिधी. परळी पासून जवळच असलेल्या मौजे दाऊतपूर येथील बौद्ध समाजाच्या तरुणांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण झाल्याची घटना पंधरा दिवसापूर्वी घडली होती. याप्रकरणी आरोपीविरुद्ध अट्रॉसिटीसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या ॲट्रॉसिटी प्रकरणातील सर्व आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत. परंतु पोलिसांनी आरोपीशी संगणमत करून उलट बौद्ध समाजातील तरुणावरच आणि सामाजिक कार्य करणाऱ्या शिक्षकावर खोटे 395 यासारखे दरोड्याचे व इतर गुन्हे दाखल केल्याने बौद्ध समाजात संतापाची लाट उसळली आहे. सदर खोटे गुन्हे रद्द करावे अन्यथा पोलिसांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बौद्ध संघर्ष समिती, वंचित बहुजन आघाडी व इतर आंबेडकरवादी पक्ष आणि संघटनांनी दिला आहे. तर गेले दोन दिवसापासून दाऊतपूर येथील बौद्ध समाजाच्या महिला व पुरुष उपविभागीय कार्यालयासमोर झालेल्या अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी उपोषणाला बसलेल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की परळी तालुक्यातील दाऊतपूर येथे दिनांक 24 मे रोजी बौद्ध तरुणांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी आकाश अश्रुबा मुंडे यांच्या फिर्यादीवरून त्यावेळी मारुती उत्तम काचगुंडे, ज्ञानदेव बाबुराव काचगुंडे ,खंडू उत्तम काचगुंडे, वैजनाथ बाबुराव काचगुंडे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपींना परळी ग्रामीण पोलिसांनी अद्याप पर्यंत अटक केलेले नाही. यातील मारूती उत्तम काचगुंडे यांच्यावर 302 सारखा गंभीर गुन्हा असल्याचे समजते ही गंभीर बाब आहे. त्याला पोलिसांचा अभय आहे की काय असा संशय निर्माण होत आहे.
दरम्यान आरोपींशी संगणमत करून उलट दिनांक 9 जून रोजी मारहाण झालेल्या बौद्ध युवकावरच परळी ग्रामीण पोलिसांनी ज्ञानेश्वर बाबुराव काचगुंडे यांच्या फिर्यादीवरून कलम 395, 341, 324, 323, 504, 506 भादवी अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. याप्रकरणी न्याय मिळावा म्हणून दाऊतपूर येथील बौद्ध समाजाच्या अनुसया भालेराव, सुमित सुरवसे ,आशाबाई सुरवसे, सुनीता मुंडे, मंदाबाई मुंडे, बाबुराव मुंडे, लंकाबाई मुंडे, पूजा मुंडे, शंकर मुंडे आदी बौद्ध समाजाचे महिला, पुरुष गेल्या दोन दिवसापासून परळी उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. तसेच दाखल करण्यात आलेले खोटे 395 चे गुंन्हे मागे घेण्यात यावेत, ॲट्रॉसिटी प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी व दाऊतपूर येथील बौद्ध समाजाला पोलीस संरक्षण द्यावे आदी प्रमुख मागण्यासह उपोषणाला बसले आहेत .
दरम्यान या प्रकरणी दाऊतपूर ॲट्रॉसिटी प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करा, दाखल करण्यात आलेले 395 व इतर बहुजन समाजावरील गुन्हे रद्द करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा एका निवेदनाद्वारे या बौद्धजन संघर्ष समिती,व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परळी उपविभागीय अधिकारी तसेच परळी तहसीलदारांन देण्यात आले आहे.
