केज तालुक्यात केज-युसूफवडगाव दोन पोलीस ठाणे असूनही पोलिसांना अवैध धंद्यांना आवर घालता येईना
रोखठोक न्युज वार्ताहर
केज तालुक्यामध्ये दोन पोलीस स्टेशन असताना देखील या दोन्ही पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आपल्या हद्दीत चालत असलेल्या अवैध धंद्यांना आवर घालता येईना. याला कोणाची संमती आहे? की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिकांना पडला असून आमची पोरं बाळ मात्र उध्वस्त आयुष्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. याला पोलीस यंत्रणाच जबाबदार असल्याचा स्पष्ट आरोप केला जाऊ लागला आहे.
केज हे तालुक्याचे शहर वगळता या तालुक्यात सर्व गावात ग्रामपंचायत आहेत. यावरून लोकसंख्या देखील त्या त्या गावची त्या त्या प्रमाणात आहे. केज तालुक्यातील केज आणि युसूफ वडगाव या दोन पोलीस स्टेशनच्या हदीत ग्रामीण भाग येतो. सहाजिकच दोन्हीही पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि बीट अंमलदारांना कोणत्या गावात काय चालतं? याची मुखपाठ माहिती असते. परंतु या दोन्हीही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धंधाने एवढा जोर धरला आहे की, याच्याकडे वरिष्ठ अधिकारी का लक्ष देत नाहीत, असा प्रश्न ग्रामीण भागातील लोकांना पडला आहे. केजला डिवाएसपी म्हणून पंकज कुमावत होते तेव्हा युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शासकीय कामाव्यतिरिक्त कुठेही मतलबासाठी लक्ष देता येत नव्हतं. परंतु आज एवढी भयानक परिस्थिती झाली आहे की, कोणी कोणाला मोजायला तयार नाही असे दिसून येऊ लागले असल्याचे ग्रामीण लोक सांगत आहेत.
युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावोगावी मटका, अवैध गुटखा विक्री, अवैध दारू विक्री जोमात चालत असून कित्येक धाबे अवैध दारू विक्री वरच चालतात हे स्पष्ट चित्र आहे. या संदर्भात दोन्हीही पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना काही देणं घेणं नाही असं दिसून येत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. नव्हे तर या दोन्हीही पोलीस ठाण्याचे संबंधित वसूली पोलीस महिन्याकाठी हप्ता वसुलीसाठी कुठेतरी हॉटेल चहा पीत गप्पा मारत बसलेले दिसून येतात. जणू या पोलिसांच्या संमतीने या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे बोकाळले असल्याचा आरोप देखील केला जात आहे. त्यामुळे याचा फटका ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर यांच्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. कित्येक शेतकरी व शेतमजुराची तरुण मुले व्यसनाधीन होऊ लागली आहेत. मटक्याच्या नादी लागून पैसे घालू लागले आहेत. दारू पिऊन घरात अशांतता निर्माण करीत आहेत. या दोन्हीच्या नादामध्ये मात्र कुटुंबातील पैसा बाहेर जाऊ लागला. कित्येक तरूण वाम मार्गाला लागत आहेत. आपल्या हद्दीतील गावागावात चालत असलेल्या अवैध धंद्यांना केज आणि यूसूफ वडगाव पोलिसांना आवर घालता येईना. यामुळे या तरुणांची उध्वस्त आयुष्याच्या दिशेने वाटचाल होऊ लागली आहे. ती केवळ आणि केवळ दोन्ही पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचा-यांमुळे असा स्पष्ट आरोप ग्रामस्थ करीत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील याची जाणीव नसावी याबद्दल देखील शंका घेतल्या जात आहेत.
