पाच लॉजच्या मालकांसह मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल
केजमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लॉजवर कारवाई
रोखठोक न्युज वार्ताहर
केज पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या लॉजची अचानक तपासणी करीत शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या पाच लॉजच्या मालक व मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या आदेशावरून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.१५ ते १२.४५ वाजेच्या सुमारास केज – मांजरसुंबा या राष्ट्रीय महामार्गावरील मस्साजोग येथील संघर्ष लॉज व अजिंक्य लॉज, उमरी फाट्यावरील सागर प्रताप लॉजची तपासणी केली. त्यानंतर मध्यरात्री १.४५ ते २.३० वाजेच्या अंबाजोगाई रस्त्यावरील पिसेगाव शिवारातील सुजित लॉज व धारूर रस्त्यावरील तांबवा शिवारातील श्रेया लॉजची झडती घेतली. या तपासणीत पाच लॉजच्या मालक व मॅनेजरने शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तीचे पालन केले नसल्याचे निदर्शनास आले. डीएसबीचे पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख यांच्या तक्रारीवरून या पाच लॉजच्या मालक व मॅनेजरक्रुिद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास जमादार दत्तात्रय बिक्कड व जमादार श्रीकांत चौधरी हे करीत आहेत. अशा प्रकारे केज व तालुक्यात अनेक ठिकाणी सर्रासपणे नियमांचे उलंघन केले जात आहे. त्याच प्रमाणे अवैध धंदे केले जात आहेत. अशा धंदेवाल्यांवरही कारवाई करावी अशी मागणी केज येथील सर्वसामान्य नागरीक करत आहेत.
