*वाल्मिक कराड,विष्णु चाटे यांच्यासह तिघांवर खंडणीचा गुन्हा*
● *अवादा एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे २ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप*
रोखठोक न्युज वार्ताहर
केज – अवादा एनर्जी कंपनीचे केज तालुक्यात सुरू असलेली पवन उर्जा प्रकल्पाच्या मांडणी व उभारणीची काम बंद करा, अन्यथा २ कोटी रुपये द्या अशी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे खंडणीची मागणी केल्याच्या आरोपावरून वाल्मिक कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे व सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले या तिघांविरुद्ध केज पोलिसात बुधवारी (दि.११) रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
अवादा एनर्जी प्राव्हेट लिमीटेड कंपनीचे केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवन उर्जा प्रकल्पाचे मांडणी व उभारणीचे काम सुरू आहे. तर मस्साजोग या ठिकाणी प्रकल्पाचे मुख्य कार्यालय आहे. या कंपनीचे प्रकल्प अधिकारी म्हणून सुनिल केदु शिंदे हे काम पाहत असून त्या ठिकाणी त्यांच्या सोबत विविध प्रकल्पाचे अधिकारी काम पाहत आहेत. त्यांनी केज पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, २९ नोव्हेंबर रोजी शिंदे यांच्या मोबाईलवर विष्णु चाटे यांनी फोन केला.
कार्यालयात हजर असतांना माझे मोबाईल क्रमांक ७३०३०९३०४५ वर विष्णु चाटे यांचा मोबाईल क्रमांक ९७६३७३६५७७ वरून फोन आला व त्यांनी मला वाल्मिक आण्णा बोलणार आहेत असे सांगितले. त्यानंतर अरे काम बंद करा, ज्या परिस्थीती मध्ये सुदर्शनने सांगितले आहे, त्या परिस्थीतीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, काम चालु केले तर याद राखा, असे म्हणुन प्रकल्पाचे काम बंद करण्याची धमकी दिली. त्याच दिवशी दुपारी सुदर्शन घुले याने कार्यालयात येऊन काम बंद करा अन्यथा तुमचे हात पाय तोडू अशी धमकी दिली. काही दिवसापुर्वी कंपनीचेच शिवाजी थोपटे यांना वाल्मिक कराड यांनी त्यांचे परळी येथील कार्यालयात बोलावून अवादा कंपनीचे केज तालुक्यातील सर्व काम बंद करा असे सांगितले. काम चालू ठेवायचे असेल तर दोन कोटी रूपये द्या असे सांगितले होते. त्यानंतर वेळोवेळी विविध लोकांचे मोबाईलवरुन प्रत्यक्ष – अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचे काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याच्या व जिवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. यापूर्वी २८ मे २०२४ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास याच कारणावरून त्यांचे अपहरण केलेले होते, याचा गुन्हा दाखल आहे. तर ६ डिसेंबर २०२४ रोजी सुदर्शन घुले व इतरांनी अवादा कंपनीच्या मस्साजोग येथील प्रकल्पाचे ठिकाणी जबरदस्तीने प्रवेश करीत गेटवरील कामगारांना धमकी देऊन मारहाण केली होती. त्यावेळी कंपनीचे शिवाजी थोपटे यांनी सुदर्शन घुले व इतर लोकांविरूध्द केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे असे फिर्यादीत नमूद करीत अवादा कपंनीचे केज तालुक्यातील पवन उर्जा प्रकल्पाचे काम बंद करण्यासाठी वारंवार धमक्या येत असून त्यामुळे त्यांच्या दहशतीखाली असल्याने व मन:स्थिती बरोबर नसल्याने कंपनीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांचे सल्ल्याने ११ डिसेंबर रोजी तक्रार देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर फिर्यादीवरून वाल्मिक कराड, विष्णु चाटे, सुदर्शन घुले या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश बनसोड हे करीत आहेत.
