संतोष देशमुख हत्याकांड; राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विष्णु चाटेचा आरोपीत समावेश
मृतदेहावर दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार, आरोपींच्या अटकेसाठी सहा पथके रवाना
रोखठोक न्युज वार्ताहर
सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी केज तालुका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष विष्णू चाटे यांचे नाव आरोपी म्हणून समोर आल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या मृतदेहावर दुसऱ्या दिवशी मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
दि.९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता मस्साजोग ता. केज येथील सरपंच संतोष देशमुख यांचा टोल नाक्यावरून अपहरण करून खून करत प्रेत फेकून दिले होते. या प्रकरणी जो पर्यंत खुन्यांना अटक होत नाही, तो पर्यंत प्रेत ताब्यात घेवून अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका गावकरी आणि नातेवाईकांनी घेतली होती. तसेच दि.१० डिसेंबर रोजी मस्साजोग
आणि केज येथे १२ तासापेक्षा जास्त काळ रस्ता रोको आंदोलन केले होते. शिवाय मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि या खुनाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी विभागीय पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून व मयताच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यानंतर गुन्हेगारांना तात्काळ ताब्यात घेतले जाईल आणि या प्रकरणाशी सबंधित कुणालाही सोडले जाणार नाही असे सांगितले.
रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान उपजिल्हा रुग्णालय केज येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या देखरेखीखाली प्रेताचे शव विच्छेदन करण्यात आले. संतोष देशमुख यांच्या संपुर्ण अंगावर मारण्याचे निशान आहेत.त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्त सांगळून मयत झाल्याच प्रथम दर्शनी शव विच्छेदनात दिसत आहे.
दि.११ डिसेंबर रोजी मध्यरात्री १.३० वाजता शिदी रस्त्या लगतच्या शेतात दोन दिवसानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले
मास्टर माईंड कोण?
संतोष देशमुख यांच्या खूनात राजकीय वरदहस्त असलेला तो मास्टर माईंड कोण याची सर्वत्र चर्चा आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व सरपंच यांनी दत्ता काकडे, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध म्हणून बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत चे काम काज बंद ठेवले.
तीन आमदारांची भेट
आ. संदिप क्षीरसागर आणि आ. प्रकाश सोळुंके,आ.सुरेश धस यांनी मस्साजोग संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेवून सांत्वन केले. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, या खुनामागचा मास्टर माईंड याला पोलिसांनी ताब्यात घेणे: आवश्यक आहे.तसेच सुरेश धस यांनी तपास सिआयडी कडे न देता अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या कडे द्यावी अशी मागणी केली व त्यानी केज पोलीस ठाण्यात भेट घेऊन पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्याशी चर्चा केली.
तिघे ताब्यात, चौघे फरार
सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, जयराम चाटे आणि महेश केदार हे आरोपी असून त्यातील जयराम चाटे, महेश केदार आणि प्रतीक घुले हे पोलिसांच्या ताब्यात आहेत तर अन्य आरोपी फरार आहेत. त्यांचा पोलीस तपास करत आहेत.
दोन आरोपींना पोलीस कोठडी
पोलिसांनी या प्रकरणातील
• संशयित आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार या दोन संशयित आरोपींना केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, उर्वरित आरोपीना ताब्यात घेण्यासाठी पोलीस तपास घेत आहेत.
• खून प्रकरणातील तिसरा आरोपी प्रतीक घुले याला जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे शेलार आणि पथकाने पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथून ताब्यात घेतले आहे.
