मनमानी करणाऱ्या ‘आपले सरकार’ केंद्रावर उपजिल्हाधिकाऱ्यांचा दणका!
विनापरवाना सीएससी सेंटर चालवणाऱ्या गॅलक्सी मल्टीसर्व्हिसेसवर गुन्हा दाखल
असा दणका केज मध्ये पाहिजे!!!
रोखठोक न्यूज | प्रतिनिधी
केज व अंबाजोगाई परिसरातील ‘आपले सरकार’ केंद्रांमध्ये अव्वाच्या सव्वा शुल्क घेऊन होत असलेली लूट आता चव्हाट्यावर आली आहे. जनतेच्या तक्रारीनंतर उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने पाच केंद्रांवर थेट छापा टाकत तपासणी केली.
झांबरे या महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण तक्रारीमुळे ही कारवाई घडून आली. या कारवाईनंतर अनेक केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत.
विशेष म्हणजे, अंबाजोगाईतील गॅलक्सी मल्टीसर्व्हिसेस हे सीएससी केंद्र परवाना नसतानाही सुरू होते. नायब तहसीलदार गणेश जिडगे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून सय्यद मीर मुबीनअली मीर अर्शदअली (रा. अंबाजोगाई) याच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम २२३, ३१८ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासणीत उघडकीस आले की, संबंधित व्यक्ती शासनाने ठरवलेल्या दरापेक्षा अधिक पैसे आकारून नागरिकांची फसवणूक करत होता.
असा दणका केजमध्ये देखील हवा!
सरकारी योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहचवताना काही केंद्र चालक लूट करत असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई हीच काळाची गरज आहे.
