दुकाने बंद, ऑनलाईन मटक्याचा उघड उघड चालु —केजमध्ये मटका माफियांची निर्ढावलेली मस्ती.
इनामदार,ढोबळे,वळसे गुंड आता मालक.
केज शहरात नव्हे तर पुर्ण तालुक्यातीला धंद्याचा वळसा.
रोखठोक न्यूज | वार्ताहर
गणेश खराडे याला एमपीडीए अंतर्गत कारागृहात डांबण्यात आल्यानंतर केज शहर व तालुक्यातील मटका धंदा बंद होईल, असा दावा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात हा दावा फोल ठरला असून, दुकाने बंद दाखवून मटका धंदा ऑनलाईन माध्यमातून अधिकच तेजीत सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.तर खेडोपाड्यात बुक्की व्यवसाय जोरात सुरू आहेत.
मुख्य आरोपी जेलमध्ये असतानाही केज शहर व तालुक्यात मटका धंदा खुलेआम, निर्ढावपणे आणि पूर्वीपेक्षा अधिक संघटित स्वरूपात सुरू आहे. फरक एवढाच—आता चिठ्ठ्या दुकानात नाहीत, तर मोबाईलवर फिरत आहेत. व्हॉट्सअॅप, कॉल, ऑनलाईन आकडे आणि डिजिटल वसुलीमुळे मटका माफियांनी धंद्याचा चेहरामोहरा बदलला आहे.
दुकाने बंद, पण नेटवर्क जिवंत
बाह्य स्वरूपात मटका दुकाने बंद असल्याचे चित्र दाखवले जात असले, तरी प्रत्यक्षात घराघरातून, चहाटपरीवरून, मोबाईलच्या माध्यमातून आकडे घेतले जात आहेत. पंटर, एजंट आणि कलेक्शन पॉइंट्सची संख्या उलट वाढली असून, दिवसाढवळ्या ऑनलाईन व्यवहार सुरू असल्याची चर्चा आहे.
जेलमध्ये ‘राजा’, बाहेर ‘सेनापती’
गणेश खराडे कारागृहात असला, तरी त्याचे आदेश, व्यवस्थापन आणि वसुलीची साखळी अजूनही तुटलेली नाही. उलट, फंटरांपुरते मर्यादित असलेले नेटवर्क आता ‘ओळखीच्या, स्थिर हातां’कडे दिले गेल्याने धंदा अधिक सुरक्षित आणि मजबूत झाल्याचे चित्र आहे. एक पकडला गेला तरी उरलेले मोकाट—हीच नवी रणनीती!
पोलीस कारवाई कसे करणार ?
पोलीस कारवाई करून दुकाने बंद करू शकतात पण ऑनलाईन मटक्याच्या मुळावर कुऱ्हाड कशी मारणार हा एक मोठा गंभीर सवाल आहे, हा सवाल केजकरांना सतावत आहे.
जर मटका धंदा आजही तेजीत आहे, तर एमपीडीएची कारवाई नेमकी कुणासाठी होती? आणि जर कारवाई योग्य होती, तर धंदा बंद का नाही?
गरीबांच्या संसारावर ऑनलाईन डल्ला
मटका माफियांच्या या ‘डिजिटल सुवर्णकाळात’ मात्र गरीब, मजूर, तरुणांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. मोबाईल हातात आला की आकडे, थोडे पैसे, मोठ्या स्वप्नांची भुरळ—आणि शेवटी कुटुंब उपाशी! हे वास्तव प्रशासनाला दिसत नाही की दिसूनही दुर्लक्ष केले जात आहे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
नागरिकांचा इशारा – पुढचा नंबर कोणाचा?
आज गणेश खराडे, उद्या कोण हा प्रश्न मिटला असून आता चौघे या धंद्यात उतरले आहेत.
जर आजच या पडद्यामागील पार्टनरांवर, ऑनलाईन नेटवर्कवर आणि वसुली साखळीवर कठोर कारवाई झाली नाही, तर केजमध्ये मटका हा केवळ गुन्हा न राहता सवय आणि संस्कृती बनेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

