एक छत्री असणारा मटका धंदा, आता अनेक टोळ्यांनी घेरला आहे
आता तो प्रत्येक गावा–गावात पोहोचला आहे
(भाग दोन)
रोखठोक न्यूज | वार्ताहर
केज तालुक्यात एकेकाळी एका छत्राखाली चालणारा मटका धंदा मोडीत निघाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात हा धंदा संपलेला नसून, तो आता अनेक टोळ्यांमध्ये विभागला जाऊन अधिक आक्रमक स्वरूपात गावोगावी पसरला आहे.पोलीसांकडून शोधून कारवाई केले नाहीतर, “रोखठोक न्यूज” मालकाची यादी प्रसिद्ध करणार.
एक गेला, धंदा वाढला
गणेश खराडे एमपीडीए अंतर्गत कारागृहात गेल्यानंतर मटका बंद होईल, असा दावा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आला होता. पण एक ‘मुख्य चेहरा’ बाजूला होताच, मटका धंद्याने नवे रूप घेतले.
आता हा धंदा एका मालकाचा नसून अनेक टोळ्यांचा झाला आहे. प्रत्येक टोळीला वेगवेगळा परिसर, वेगवेगळे एजंट आणि स्वतंत्र वसुली व्यवस्था देण्यात आली आहे.
तालुकाभर मटका नेटवर्क
केज शहरात दुकाने बंद असल्याचे चित्र दाखवले जात असले, तरी ग्रामीण भागात मटका धंदा उघडपणे सुरू आहे.
प्रत्येक गावात—ओळखीचा पंटर ठरावीक वेळेला मोबाईलवर आकडे,संध्याकाळी कॅश वसुली
अशी सिस्टीम तयार करण्यात आली आहे. त्यामुळे मटका धंदा आता शहरातून बाहेर पडून शेती, मजुरी करणाऱ्या कुटुंबांपर्यंत पोहोचला आहे.
ऑनलाईन पद्धतीने सुरक्षित धंदा
चिठ्ठ्या, दुकानं, बोर्ड यांना पूर्णविराम देत मटका माफियांनी ऑनलाईन मार्ग स्वीकारला आहे.
व्हॉट्सअॅप, कॉल, मेसेज आणि डिजिटल पेमेंट्समुळे धंदा अधिक गुप्त, वेगवान आणि सुरक्षित बनला आहे.
यामुळे थेट कारवाई करणे प्रशासनासाठी अवघड होत असल्याची चर्चा आहे.
कारवाई कुठे थांबते?
दुकाने बंद केली जातात, किरकोळ पंटर पकडले जातात, पण टोळीचे सूत्रधार अजूनही मोकाट आहेत.
जर मटका धंदा गावोगावी पोहोचला असेल, तर प्रशासनाच्या कारवाईचा व्याप केवळ शहरापुरताच का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
केजकरांचा संतप्त सवाल
एक छत्री संपली, पण मटका संपला नाही.उलट तो अनेक टोळ्यांत फुटून प्रत्येक गावात रुजला आहे.
