केजमध्ये मटका पुन्हा जोमात? प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह. “फड बंधु” प्रेम डूमने, सुरेश शेठ, अक्षय सरवदे हे नवीन नावे मालक म्हणून समोर येत आहेत?
रोखठोक न्यूज | वार्ताहर
केज शहर व तालुक्यात पुन्हा एकदा मटका व्यवसाय डोके वर काढत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. गणेश खराडे यांना एमपीडीए अंतर्गत कारागृहात पाठविल्यानंतर या अवैध धंद्याला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, काही महिन्यांतच परिस्थिती पुन्हा पूर्ववत होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
स्थानिक पातळीवर नवीन मालक म्हणून प्रेम डूमने, सुरेश शेठ, अक्षय सरवदे तसेच तथाकथित “फड बंधू” या नावांभोवती मटका व्यवसाय सुरू असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहेत. काही जण स्वतंत्रपणे बुक्की चालवत असल्याची चर्चा असून, ऑनलाईन माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत असल्याची माहिती पुढे येत आहे.
गणेश खराडे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर मटका पूर्णपणे बंद झाल्याचा जो आभास निर्माण झाला होता, तो आता फोल ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शहर व तालुक्यात काही गटांनी आपापले क्षेत्र वाटून घेतल्याची चर्चा असून, पडद्यामागे काही जण सूत्रे हलवत असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे, “फड बंधू” नावाने कार्यरत असलेल्या व्यक्तींची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी जोर धरत आहे. पोलिस प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका घेत पारदर्शक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गोरगरिबांच्या कष्टाच्या पैशांवर चालणाऱ्या या कथित मटका व्यवसायामुळे अनेक कुटुंबे आर्थिक व मानसिक संकटात सापडत असल्याची खंत सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. संबंधितांवर ठोस व सातत्यपूर्ण कारवाई झाली नाही, तर हा प्रकार अधिक बळावण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
