• Sun. Apr 19th, 2026

बीडमध्ये बिल्डरला चक्क महिला बाऊन्सर्सचा पहारा! वाचा कुणाच्या दहशतीमधून घेतला निर्णय?

Bybaba maske

Feb 19, 2026

बीडमध्ये बिल्डरला चक्क महिला बाऊन्सर्सचा पहारा! वाचा कुणाच्या दहशतीमधून घेतला निर्णय?

रोखठोक न्यूज वार्ताहर 

 बीडमध्ये जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीच्या घटनेने सध्या एक वेगळेच वळण घेतले आहे.

बीडमध्ये जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीच्या घटनेने सध्या एक वेगळेच वळण घेतले आहे. तहसील कार्यालय परिसरात महिलांकडून झालेल्या हल्ल्यामुळे धास्तावलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाने आता चक्क लेडी बाऊन्सर्सचे सुरक्षा कवच घेतले आहे. बीड शहरात या अनोख्या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू असून, पुरुषाच्या सुरक्षेसाठी महिला बाऊन्सर्स तैनात असल्याचे दृश्य पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

बीड शहरातील बांधकाम व्यावसायिक सय्यद सनाउल्ला रजाउल्ला हे प्लॉट खरेदी-विक्रीच्या व्यवसायात आहेत. काही दिवसांपूर्वी ते एका जमिनीचा रीतसर व्यवहार करून तहसील कार्यालयात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी गेले होते. मात्र, याच जमिनीच्या व्यवहारावर आक्षेप घेत काही महिलांनी त्यांना भररस्त्यात गाठले. 

यावेळी झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि तीन महिलांनी सय्यद सनाउल्ला यांना बेदम मारहाण करत शिवीगाळ केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.या घटनेनंतर सय्यद सनाउल्ला रजाउल्ला कमालीचे धास्तावले आहेत. संबंधित महिलांकडून पुन्हा एकदा असाच हल्ला होऊ शकतो, अशी भीती त्यांना वाटत आहे. ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांनी एक अनोखा मार्ग निवडला आहे. त्यांनी आपल्या सुरक्षेसाठी खासगी लेडी बाऊन्सर्सची नेमणूक केली आहे. पांढरा सदरा घातलेले व्यावसायिक आणि त्यांच्यासोबत काळ्या रंगाच्या सफारीतील या महिला सुरक्षा रक्षक सध्या बीडकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.

घर आणि कार्यालयात कडक पहारा

हे महिला सुरक्षा कवच केवळ बाहेर जातानाच मर्यादित नसून, सय्यद सनाउल्ला यांच्या घराच्या परिसरात आणि त्यांच्या कार्यालयातही या लेडी बाऊन्सर्स तैनात करण्यात आल्या आहेत. जमिनीच्या व्यवहारातून उद्भवलेला हा वाद इतका विकोपाला गेला आहे की, एका पुरुष व्यावसायिकाला चक्क महिला बाऊन्सर्स नेमण्याची वेळ आली आहे. एका बाजूला महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची चर्चा होत असताना, दुसऱ्या बाजूला महिलांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी घेतलेला हा निर्णय विरोधाभास निर्माण करणारा ठरला आहे.

बीड जिल्ह्यामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून हाणामारीच्या घटना समोर येत असतात. मात्र, एका बांधकाम व्यावसायिकाने महिलांकडून होणाऱ्या संभाव्य धोक्यासाठी महिला बाऊन्सर्सची फौज उभी करणे ही जिल्ह्यासाठी पहिलीच घटना मानली जात आहे. या घटनेमुळे जमिनीच्या व्यवहारातील वाढती गुन्हेगारी आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, शहरात या प्रकरणावरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!