• Fri. Sep 11th, 2026

केज नगरपंचायतीत नियम धाब्यावर? निवृत्त कर्मचाऱ्याची थेट २ वर्षांसाठी नियुक्ती — आदेशातील तारखाच संशयाच्या भोवऱ्यात!

Bybaba maske

Feb 27, 2026

केज नगरपंचायतीत नियम धाब्यावर?

निवृत्त कर्मचाऱ्याची थेट २ वर्षांसाठी नियुक्ती — आदेशातील तारखाच संशयाच्या भोवऱ्यात!

रोखठोक न्यूज | केज

केज नगरपंचायतीत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नगरपंचायतीतून निवृत्त झालेल्या लक्ष्मण जगताप यांना लेखा विभागात कंत्राटी कामगार म्हणून थेट दोन वर्षांसाठी नियुक्ती देण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या नियुक्ती प्रक्रियेतील अनेक विसंगतींमुळे संशय अधिक गडद झाला आहे.

सामान्यतः नगरपंचायत किंवा शासकीय संस्थांमध्ये कंत्राटी नियुक्ती ११ महिन्यांच्या कालावधीसाठी केली जाते. मात्र केज नगरपंचायतीने नियमांना फाटा देत थेट दोन वर्षांचा करार केल्याचे आदेशातून दिसून येते. याचबरोबर या नियुक्तीसाठी दरमहा तब्बल २५,००० रुपये मानधन मंजूर करण्यात आल्याने प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत आहे.

याहून गंभीर बाब म्हणजे नियुक्ती आदेशातच तारखांचा घोळ आढळून येतो. आदेश देण्याची तारीख १४ फेब्रुवारी २०२२ असताना, नियुक्ती लागू झाल्याची तारीख १ जुलै २०२१ नमूद करण्यात आली आहे. म्हणजेच आदेश निघण्याच्या आधीच नियुक्ती लागू झाल्याचा प्रकार उघड झाला असून, हा प्रशासकीय नियमांचा स्पष्ट भंग असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, सहायक लेखापाल असद खतीब यांना लेखापाल पदाची जबाबदारी देण्यात आली आणि त्यांच्याच अंतर्गत लक्ष्मण जगताप यांची सहायक म्हणून निवड करण्यात आली. निवृत्तीनंतर तात्काळ अशी नियुक्ती देणे कितपत वैध आहे? निवड प्रक्रिया पारदर्शक होती का? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

विशेष म्हणजे, लक्ष्मण जगताप यांच्याकडे प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजना यांसारखी कोट्यवधी रुपयांची महत्त्वाची कामे सोपवण्यात आली होती. याच योजनांमध्ये आधीच गैरव्यवहार आणि घोटाळ्याच्या तक्रारी समोर आलेल्या असल्याने आता जनतेच्या मनात संशय अधिक बळावू लागला आहे.

ही नियुक्ती नेमकी कोणत्या मुख्याधिकाऱ्यांनी दिली? नियम मोडून आदेश काढण्यामागे कोणाचा दबाव होता? आणि आवास योजनांतील कथित घोटाळ्याशी याचा संबंध आहे का? — या सर्व बाबींची स्वतंत्र व सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

केज नगरपंचायतीतील या संपूर्ण प्रकरणामुळे “नियुक्तीचा आडोसा आणि योजनांचा खेळ” अशी चर्चा रंगली असून, संबंधित रॅकेटचा लवकरात लवकर पर्दाफाश व्हावा, अशी जनतेची तीव्र अपेक्षा आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!