• Wed. Jun 3rd, 2026

केज नगरपंचायतीतील ‘घरकुल’ घोटाळा उघडकीस; दीडशे कंत्राटदार-कर्मचाऱ्यांना नोटिसा कोट्यवधी रुपयांच्या अनियमिततेची चौकशी वेगात; बँक व्यवहारांसह निधी वितरणाचा तपशील मागवला

Bybaba maske

Mar 11, 2026

केज नगरपंचायतीतील ‘घरकुल’ घोटाळा उघडकीस; दीडशे कंत्राटदार-कर्मचाऱ्यांना नोटिसा

कोट्यवधी रुपयांच्या अनियमिततेची चौकशी वेगात; बँक व्यवहारांसह निधी वितरणाचा तपशील मागवला

रोखठोक न्यूज वार्ताहर | केज

केज नगरपंचायत अंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेतील कोट्यवधी रुपयांच्या कथित अनियमिततेप्रकरणी प्रशासनाने कारवाईची गती वाढवली असून संबंधित कंत्राटदार, कर्मचारी आणि इतर लाभार्थी अशा सुमारे १५३ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस मिळालेल्यांना ४८ तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्राथमिक चौकशीत घरकुल योजनेच्या निधीच्या वाटपात मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याची बाब समोर आली आहे. केंद्र व राज्य सरकारकडून उपलब्ध झालेल्या निधीतून लाभार्थ्यांच्या नावाने घरकुलासाठी दिल्या जाणाऱ्या रकमेऐवजी काही प्रकरणांमध्ये कंत्राटदार, व्यापारी तसेच काही कर्मचाऱ्यांच्या खात्यावर रक्कम वळविल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेक पात्र लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तपासादरम्यान कामाचा आदेश, निविदा प्रक्रिया, मोजमाप पुस्तिका तसेच मंजुरी आदेश यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे अनेक ठिकाणी उपलब्ध नसल्याचेही आढळले आहे. त्यामुळे या व्यवहारांबाबत शंका अधिकच गडद झाली असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणात काही अधिकारी-कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्यात संगनमत असल्याचीही चर्चा असून चौकशी समितीने बँक व्यवहारांचा तपशीलही मागवला आहे. त्यामुळे निधीचा प्रवाह नेमका कुठे व कसा वळवला गेला याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

नोटीस बजावलेल्या संबंधितांना ४८ तासांत समाधानकारक खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

रोखठोक न्यूज – जनसामान्यांच्या अन्यायाविरोधात आवाज.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!