केजमध्ये एचपी गॅस एजन्सीवर राडा; कर्मचाऱ्याला मारहाण, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
रांगेत उभे राहण्यावरून ग्राहकांत बाचाबाची; जखमी कर्मचाऱ्याला स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई येथे हलवले
रोखठोक न्यूज वार्ताहर
केज शहरातील एचपी गॅस एजन्सीवर गॅससाठी आलेल्या ग्राहकांमध्ये मोठा वाद निर्माण होऊन एका कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून संबंधित मारामारीचा सीसीटीव्ही फुटेजही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे गॅस पुरवठा कमी होणार असल्याची अफवा पसरल्याने नागरिक मोठ्या संख्येने गॅस एजन्सीकडे धाव घेत आहेत. त्यामुळे एजन्सीसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अशाच गर्दीत रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून ग्राहकांमध्ये वाद निर्माण झाला.
या वादाचे रूपांतर काही वेळातच मारामारीत झाले. या गोंधळात एचपी गॅस एजन्सीचे कर्मचारी आकाश बोराडेयांना ग्राहकांकडून मारहाण करण्यात आली. जखमी अवस्थेत
त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती लक्षात घेता पुढील उपचारासाठी त्यांना स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय येथे रेफर करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अजूनपर्यंत या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती मिळत आहे. सध्या गॅस एजन्सीवर नागरिकांची गर्दी कायम असून परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.
गॅससाठी वाढलेली गर्दी आणि निर्माण झालेला तणाव लक्षात घेता आता गॅस वितरणासाठी पोलीस बंदोबस्त लावण्याची वेळ येऊ शकते, अशी चर्चा शहरात सुरू आहे.
