• Sun. Apr 19th, 2026

माजी मंत्री डॉ. विमल मुंदडा यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन; दूरदृष्टीतून उभे राहिले विकासाचे भक्कम पाय

Bybaba maske

Mar 23, 2026

माजी मंत्री डॉ. विमल मुंदडा यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन; दूरदृष्टीतून उभे राहिले विकासाचे भक्कम पाय

अंबाजोगाई/केज | प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवणाऱ्या माजी मंत्री व पाच वेळा आमदार राहिलेल्या विमलताई मुंदडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सर्वत्र त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघातून त्यांनी अनेक वेळा जनतेचा विश्वास संपादन करत प्रभावी नेतृत्व दिले होते.

1990 साली राजकारणात प्रवेश करून त्यांनी सार्वजनिक बांधकाम, आरोग्य तसेच महिला व बालविकास या महत्त्वाच्या खात्यांची मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यशैलीत जनतेशी थेट संवाद, विकासाभिमुख दृष्टीकोन आणि सर्वसामान्यांप्रती असलेली बांधिलकी स्पष्टपणे दिसून येत होती.

डॉ. मुंदडा यांची विशेष ओळख म्हणजे त्यांची दूरदृष्टी. अंबाजोगाई भविष्यात जिल्हा म्हणून विकसित होईल, या विचारातून त्यांनी अनेक महत्त्वाची पावले उचलली. त्याअंतर्गत अपर जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच लोखंडीसावरगाव येथे MH-44 आरटीओ कार्यालय उभारणीसाठी पुढाकार घेतला. आरोग्य क्षेत्रातही त्यांनी मोठी गुंतवणूक करत भविष्यात जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळेल या दृष्टीने स्त्री रुग्णालय, वृद्धत्व व मानसिक रुग्णालयाची उभारणी केली.

केज शहरात उपजिल्हा रुग्णालय उभारून त्यांनी ग्रामीण भागातील आरोग्य सेवांना नवे बळ दिले. त्यांच्या या विकासकामांमुळे केवळ पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या नाहीत, तर सामान्य नागरिकांच्या जीवनमानातही सकारात्मक बदल घडून आला.

त्यांच्या निधनानंतरही मुंदडा कुटुंबाचा राजकीय व सामाजिक वारसा आजही कायम आहे. त्यांचे पती नंदकिशोर मुंदडा सध्या अंबाजोगाई शहराचे नगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांची सून नमिताताई मुंदडा केज मतदारसंघाचे आमदार म्हणून जनतेची सेवा करत आहेत.

आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, त्यांच्या कार्याची आठवण करून देत अनेकांनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

डॉ. विमलताई मुंदडा यांनी केलेल्या विकासकामांमुळे आणि त्यांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी जनमानसात अढळ स्थान निर्माण केले असून, त्यांच्या स्मृती आजही प्रेरणादायी ठरत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!