• Wed. Jun 3rd, 2026

३६ कोटींची कामे एकाच ठेकेदाराच्या घशात? केजमध्ये ‘अदृश्य हात’मुळे संताप उसळला! राजीव गांधी तळे व केजडी नदी कामांपासून रस्ते-नालीपर्यंत एकाच गुत्तेदाराचा दबदबा; नगरपंचायत यंत्रणा ‘मॅनेज’ असल्याची चर्चा

Bybaba maske

Mar 24, 2026

३६ कोटींची कामे एकाच ठेकेदाराच्या घशात? केजमध्ये ‘अदृश्य हात’मुळे संताप उसळला!

राजीव गांधी तळे व केजडी नदी कामांपासून रस्ते-नालीपर्यंत एकाच गुत्तेदाराचा दबदबा; नगरपंचायत यंत्रणा ‘मॅनेज’ असल्याची चर्चा

रोखठोक न्यूज वार्ताहर | केज

केज शहरात सुरू असलेल्या तब्बल ३६ कोटी रुपयांच्या विकासकामांवरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. राजीव गांधी तळे विकास आणि केजडी नदी सुशोभीकरण ही दोन्ही महत्त्वाची कामे एकाच ठेकेदार — सी.बी. बिक्कड — यांना देण्यात आल्याने नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. एवढ्या मोठ्या निधीची कामे एकाच व्यक्तीकडे का व कशी गेली, हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे.

एकाच ठेकेदारावर एवढा विश्वास का?

नगरपंचायत व संबंधित विभागांनी निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली का, इतर ठेकेदारांनी सहभाग घेतला होता का, की सर्व काही आधीच ठरवून देण्यात आले? याबाबत अधिकृत माहिती अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

रस्ते-नालीपासून कोट्यवधींच्या कामांपर्यंत एकच नाव!

विशेष म्हणजे, शहरातील रस्ते, नाली आणि इतर लहान-मोठ्या कामांमध्येही याच ठेकेदाराचे नाव सातत्याने पुढे येत आहे. त्यामुळे “केज नगरपंचायतमध्ये इतर ठेकेदार नाहीत का?” असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

‘अदृश्य गुत्तेदार’ची चर्चा रंगात

स्थानिक राजकीय वर्तुळात मात्र अधिक गंभीर आरोप होत आहेत. रोखठोक न्यूजच्या सूत्रांनुसार, केज नगरपंचायतमधील एक प्रभावशाली नेता-नगरसेवक या ठेकेदार कंपनीत भागीदार असल्याची जोरदार चर्चा आहे. अधिकृत कागदपत्रांमध्ये नाव नसले तरी निर्णय प्रक्रियेवर त्यांचा प्रभाव असल्याचे बोलले जात आहे.

विकास की ठरवून वाटप?

राजीव गांधी तळे आणि केजडी नदी ही दोन्ही कामे मुख्य वस्तीपासून दूर भागात सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. “जनतेच्या मूलभूत गरजा बाजूला ठेवून ठराविक कामांवर कोट्यवधींचा पाऊस का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नगरपंचायत यंत्रणा ‘मॅनेज’?

सतत एकाच ठेकेदाराला कामे मिळत असल्यामुळे नगरपंचायतची संपूर्ण यंत्रणा ‘मॅनेज’ असल्याची शंका नागरिक व्यक्त करत आहेत. पारदर्शकतेचा अभाव आणि माहिती देण्यास टाळाटाळ यामुळे संशय अधिकच गडद होत आहे.

नागरिकांची ठाम मागणी

संपूर्ण टेंडर प्रक्रिया सार्वजनिक करावी

पात्र व सहभागी ठेकेदारांची यादी जाहीर करावी

प्रत्येक कामाचा सविस्तर खर्च जाहीर करावा

स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी समिती नेमावी

“जर सर्व काही नियमांनुसार असेल, तर माहिती लपवण्याची गरज काय?” असा थेट सवाल आता केजमधील नागरिक विचारू लागले आहेत.

या प्रकरणामुळे येत्या काही दिवसांत केज शहरातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!