केज नगरपंचायतीचा कारभार उघडा पडला! १२१५ पैकी १०१३ घरकुल परत; ‘ज्योतीराम घाडगे’च्या चुकीच्या सर्वेक्षणाने घरकुल धारक वंचित.
वडार वस्ती, क्रांतीनगर,रोजामोहल्ला परिसरातील अत्यंत गरीब, मजूर तसेच वडार व पारधी समाजातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर घरकुल नामंजूर झाल्याने संतापाची लाट उसळली आहे.
१५ हजारांची वसुली करून बोगस सर्वेक्षण; पात्रतेचा बोजवारा
त्रुटीपूर्ण यादी थेट पाठवली; नगरपंचायतीची मोठी नामुष्की
१२१५ पैकी फक्त २०२ मंजूर; १०१३ घरकुल योजना रद्द
रोखठोक न्यूज वार्ताहर | केज
केज नगरपंचायतीच्या नाकर्तेपणाचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसला असून, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या १२१५ घरकुलांपैकी तब्बल १०१३ घरकुल परत गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण नगरपंचायत प्रशासनावर निष्क्रियतेचा ठपका ठेवला जात असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करताना डिपीआर म्हणून काम पाहणारे ज्योतीराम घाडगे यांनी मोठ्या प्रमाणावर त्रुटीपूर्ण व बोगस सर्वेक्षण केल्याचे आरोप होत आहेत. प्रत्येकी सुमारे १५ हजार रुपये घेऊन आधार कार्डच्या आधारेच नोंदणी करण्यात आली. गायरान धारक, इनामी जमीनधारक तसेच कबाले धारकांची कोणतीही शासकीय पडताळणी न करता यादीत समावेश करण्यात आला.
या सर्व त्रुटीपूर्ण याद्या कोणतीही शहानिशा न करता केज नगरपंचायतीकडून पुढे पाठवण्यात आल्याने अखेर हा घोळ उघडकीस आला. परिणामी १२१५ पैकी केवळ २०२ लाभार्थ्यांचेच घरकुल मंजूर झाले असून उर्वरित १०१३ लाभार्थी योजनेंतून बाद झाले आहेत.
विशेष म्हणजे, या योजनेअंतर्गत नगरपंचायत आवारात मोठ्या गाजावाजात नगराध्यक्षांच्या हस्ते मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात आज अनेक लाभार्थी घरकुलापासून वंचित राहिले असून त्यांच्या आशांवर पाणी फिरले आहे.
वडार वस्ती, क्रांतीनगर,रोजामोहल्ला परिसरातील अत्यंत गरीब, मजूर तसेच वडार व पारधी समाजातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर घरकुल नामंजूर झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. या प्रकारासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर व नगराध्यक्षांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
एकूणच, केज नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे गरजू नागरिकांना घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागले असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

