“चमत्कार” दाखवण्याच्या बहाण्याने वृद्धेची सोन्याची अंगठी लंपास; स्थानिक गुन्हे शाखेची जलद कारवाई, आरोपी जाळ्यात!
रोखठोक न्यूज वार्ताहर
“चमत्कार दाखवतो” असे सांगून वृद्ध महिलेची सोन्याची अंगठी चोरणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने चपळाईने जेरबंद केले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, केज येथील भीमा सोनाजी जाधवर (वय 58, रा. काशीदवाडी) यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी तक्रार दाखल केली होती. त्या सकाळी केज बसस्थानकावर पुण्याला जाण्यासाठी थांबल्या असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याशी संवाद साधला. “तुम्हाला चमत्कार दाखवतो” असे सांगून त्यांनी त्यांच्या हातातील सुमारे 6 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी घेतली आणि कागदात गुंडाळून ठेवण्यास सांगितले. त्यानंतर 10 मिनिटांनी पाहिल्यावर अंगठी गायब झाल्याचे लक्षात आले.
या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, बीड करत होती. तपासादरम्यान पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासात हे आरोपी “मदारी खेळ” करत लोकांची फसवणूक करत असल्याचे उघड झाले.
पोलीसांनी अमजद नवाब मदारी (रा. सावरगाव, ता. येवला, जि. नाशिक) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार अशरफ रज्जाक मदारी यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरीची सोन्याची अंगठी (सुमारे 6 ग्रॅम, किंमत अंदाजे ₹24,000) व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
सदर आरोपीला पुढील कारवाईसाठी केज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, फरार साथीदाराचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि महेश विघ्ने, पोह/ महेश जोगदंड, पोह जफर पठाण, पोह/दिलीप गित्ते, /गणेश मराडे यांनी केली.
