केज तालुक्यातील माळेगाव चौकात कारवाई : अवैध दारूसह आरोपी ताब्यात; ५.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त
रोखठोक न्यूज वार्ताहर
कळंब ते केज दरम्यान अवैध दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी माळेगाव चौक येथे सापळा रचून अटक केली. या कारवाईत देशी-विदेशी दारूसह स्विफ्ट कार असा एकूण ५ लाख ५९ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या नेतृत्वात कारवाई.
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, केज येथील पथकाने दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ७.०५ वाजता ही कारवाई केली. सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांच्या आदेशानुसार सापळा रचण्यात आला होता.
या वेळी श्रीकृष्ण गोरख राख (वय ३२, रा. होळ, ता. केज, सध्या मुक्काम केज) हा आरोपी स्विफ्ट VDI (क्र. MH-12-EX-3519) या कारमधून विना परवाना देशी व विदेशी दारूची वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेत त्याच्या वाहनाची झडती घेतली असता ८८ हजार रुपयांची देशी दारू व ७१ हजार ८६० रुपयांची विदेशी दारू असा साठा मिळून आला.
आरोपीस पुढील कारवाईसाठी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास चोपने यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, बीड व अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम, विकास चोपने, अशफाक इनामदार, शिवाजी कागदे व सिध्दीक शहा यांनी केली.
